भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नुकत्याच सादर केलेल्या आपल्या मासिक हवाई वाहतूक अहवालानुसार ऑगस्ट महिन्यातील बेळगाव विमानतळाच्या प्रवासी संख्येत सप्टेंबरमध्ये 3 व 9 टक्क्यांनी घट झाली आहे.
नागरी विमान वाहतूक संचलनालयाने येत्या 29 ऑक्टोबर 2022 पर्यंत स्पाइस जेट विमानासाठी 50 टक्के प्रवासी वाहतुकीचा निर्बंध घातला आहे. परिणामी विमान फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवासी संख्येत ही घट झाली असावी असा कयास आहे.
बेळगाव विमानतळावरून गेल्या सप्टेंबर महिन्यात 23,478 प्रवाशांनी हवाई प्रवासाचा लाभ घेतला होता. ही संख्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत 2,458 इतकी कमी आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात या विमानतळावरून 25,603 प्रवाशांनी हवाई प्रवासाचा लाभ घेतला होता. त्याचप्रमाणे भारतीय विमानतळ प्राधिकरणानुसार बेळगाव विमानतळावरून ऑगस्टमधील 23,145 प्रवाशांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये 579 कमी म्हणजे 22566 प्रवाशांनी हवाई प्रवासाचा लाभ घेतला.
बेळगाव विमानतळावरून एकंदर ऑगस्ट महिन्यात 485 तर सप्टेंबर महिन्यात 472 विमानांचे चलनवलन झाले.