तानाजी गल्ली, हलगा येथे पिण्याचे पाण्याची सोय करून देण्याबरोबरच रस्ता आणि गटारीची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी सदर गल्लीतील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हलगा (ता. जि. बेळगाव) येथील तानाजी गल्लीतील रहिवाशांनी विशेष करून महिलांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. हलगा येथील तानाजी गल्लीमध्ये 18 घरे आहेत. या घरांसाठी आजतागायत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही.
त्याचप्रमाणे गल्लीतील रस्ता बांधण्यात आलेला नाही, शिवाय या गल्लीसाठी गटारी व ड्रेनेजची सोय देखील नाही. या संदर्भात ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांकडे अनेकदा प्रत्यक्ष भेटून तसेच लेखी निवेदनाद्वारे अनेकदा तक्रार करून देखील त्याची अद्याप पर्यंत दखल घेण्यात आलेले नाही.
पिण्याचे पाणी, रस्ता, गटारी यासारख्या मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तानाजी गल्लीतील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तरी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर गल्लीत पिण्याच्या पाण्याची सोय करण्याबरोबरच रस्ता आणि गटारीसह ड्रेनेज बांधण्याचे आदेश आपण संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत. त्याचप्रमाणे नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमच्या गल्लीत पिण्याचे पाणी, चांगला रस्ता व गटारीची सोय नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत.
सांडपाणी पाणी घराच्या आसपास साचून अस्वच्छता दुर्गंधी पसरण्याबरोबरच आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. गल्लीतील रस्त्यावर काहींनी अतिक्रमण ही केले आहे. तेंव्हा आमच्या गल्लीत युद्धपातळीवर पिण्याच्या पाण्याची सोय करण्याबरोबरच रस्ता व गटारीचे बांधकाम करण्यात यावे अशी आमची मागणी आहे असे तानाजी गल्लीतील महिलांनी सांगितले. निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये गृहिणींची संख्या लक्षणीय होती.