belgaum

रिक्षा चालकाची प्रामाणिकता ठरली आदर्श

0
970
 belgaum

बेळगाव लाईव्ह :खानापूर शहरात एका साध्या रिक्षाचालकाने दाखवलेली प्रामाणिकता आज सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. रोजच्या धावपळीत अनेकदा दुर्लक्षित होणाऱ्या या व्यवसायातही माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण सहदेव मोरे यांनी घालून दिले.

शहरातील शिवस्मारक चौक रिक्षा स्थानकावर काम करणारे सहदेव मोरे यांना त्यांच्या रिक्षामध्ये एक पर्स आढळली. ती एका महिला प्रवाशाची असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ती स्वतःकडे सुरक्षित ठेवत योग्य मालकाचा शोध सुरू केला. त्या पर्समध्ये दीड तोळ्याचा सोन्याचा हार आणि रोख रक्कम असल्याने प्रसंग अधिक महत्त्वाचा होता.

दरम्यान, ही पर्स पुण्यात वास्तव्यास असलेल्या राजश्री मनोळकर यांची असल्याचे समोर आले. त्या आपल्या पती सुभाष मनोळकर यांच्यासह नातेवाईकांच्या लग्नासाठी खानापूरला आल्या होत्या. घाईगडबडीत त्यांनी पर्स रिक्षामध्येच विसरली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पर्स सापडल्यानंतर सहदेव मोरे यांनी तत्काळ रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दत्ता वंजारे यांच्याशी संपर्क साधून प्रवाशांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

 belgaum

काही वेळातच मनोळकर दांपत्याशी संपर्क साधण्यात यश आले आणि दुपारी शिवस्मारक चौकात सर्वांच्या उपस्थितीत पर्समधील सोन्याचा हार आणि रोख रक्कम त्यांना परत करण्यात आली. हरवलेली मौल्यवान वस्तू पुन्हा मिळाल्याने मनोळकर कुटुंबियांनीही मोरे यांचे आभार मानले.

या प्रसंगी स्थानिक नागरिक, रिक्षाचालक आणि पत्रकार उपस्थित होते. सहदेव मोरे यांच्या या प्रामाणिक कृतीमुळे खानापूर शहरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, “प्रामाणिकपणा अजून जिवंत आहे” याची जाणीव या घटनेने पुन्हा एकदा सर्वांना करून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.