belgaum

दिवाळीच्या खरेदीसाठी बेळगावच्या बाजारपेठांत तुफान गर्दी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : दिवाळीचा सण जवळ येताच बेळगावच्या बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सणाच्या तयारीसाठी आवश्यक पूजेचे साहित्य, आकाशकंदील आणि आकर्षक सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

शहरातील पांगुळ गल्ली, गणपत गल्ली आणि खडे बाजार या प्रमुख व्यापारी केंद्रांमध्ये सध्या खरेदीदारांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील नागरिक तसेच कोकण आणि गोवा परिसरातूनही अनेकजण दिवाळीच्या खरेदीसाठी बेळगावमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवसभर गजबजलेले वातावरण आहे.

दिवाळीनिमित्त बाजारपेठेत विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. आकर्षक रंगसंगती आणि वेगवेगळ्या आकारांतील आकाशकंदील, मातीच्या पणत्या, विद्युत दिवे, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि रोषणाईच्या माळांनी दुकाने सजली आहेत. याशिवाय लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य, अगरबत्ती, कापूर, धूप, फळे आणि फुलांचे हार खरेदी करण्यासाठीही ग्राहकांची गर्दी होत आहे.

 belgaum

लहान मुलांना आकर्षित करणारे छोटे आकाशकंदील तसेच घराच्या सजावटीसाठी उपयुक्त असलेल्या विविध वस्तूंचे स्टॉलही बाजारपेठेत उभारण्यात आले आहेत. ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन विक्रेत्यांनी विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. पारंपरिक सजावटीच्या वस्तूंसोबतच आधुनिक रोषणाईच्या साहित्यालाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.

दिवाळीच्या स्वागतासाठी घरांची सजावट आणि लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू झाल्याने बाजारपेठेतील खरेदीला वेग आला आहे. कुटुंबासह बाजारात येणारे नागरिक आवश्यक वस्तूंची खरेदी करताना दिसत असून, वाढत्या ग्राहकवर्दळीमुळे व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.