बेळगाव लाईव्ह : ऑनलाइन आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातून मोठी रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट नोटांच्या आधारे फसवणूक करण्याचा प्रयत्न बेळगावमध्ये उघडकीस आला आहे. पाच कोटी रुपयांच्या व्यवहाराचे प्रलोभन दाखवून तीन कोटी रुपये रोख स्वरूपात घेण्याचा डाव आखण्यात आला होता. या प्रकरणी सीसीबी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, संशयितांकडून रोख रक्कम, मोबाईल आणि बनावट बँक स्टेटमेंट जप्त केले आहे.
७ नोव्हेंबर २०२६ रोजी सीसीबीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतिनगर येथे छापा टाकला. अशोक मरेप्पा तवनाचे यांच्या घराच्या तळमजल्यावर सुरू असलेल्या संशयास्पद व्यवहाराची तपासणी केली असता फसवणुकीचा प्रकार समोर आला.
मार्स इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाचा वापर करून ऑनलाइन व्यवहाराद्वारे पाच कोटी रुपये व्हाइट मनी स्वरूपात देण्याचे आमिष दाखवण्यात येत होते. त्याबदल्यात तीन कोटी रुपये ब्लॅक मनी स्वरूपात रोख स्वीकारण्याची योजना असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या व्यवहाराच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू होता.
याप्रकरणी शिवलिंगय्या राजय्या गणाचारी, सागर लक्ष्मण किळकेते आणि विनायक गणपती नोकारे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासादरम्यान मुलांच्या खेळण्यातील नोटा खऱ्या चलनी नोटा असल्याचे भासवून त्याआधारे ऑनलाइन पैसे हस्तांतरित करून घेण्याचाही प्रयत्न झाल्याचे उघड झाले.
या प्रकरणाशी संबंधित शिवानंद कल्लाप्पा मुनवळ्ळी याच्यासह अन्य संशयितांचीही चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी ३५ हजार रुपये रोख, मोबाईल संच आणि बनावट बँक स्टेटमेंट जप्त केले आहेत. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, या फसवणूक प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.




