बेळगाव लाईव्ह: खानापूर तालुक्यातील होनकल येथे शेतातून जाणाऱ्या पायवाटेच्या वादातून दोन महिलांवर जातिवाचक शिवीगाळ करून कोयत्याने हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ६७ वर्षीय आरोपीला बेळगाव येथील तिसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. आरोपी वासुदेव रुद्राप्पा पाटील (वय ६७, रा. होनकल, ता. खानापूर) असे त्याचे नाव आहे.
या प्रकरणी फिर्यादी नागू नेमाना मादार यांनी खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादी यांची होनकल गावात अडीच एकर शेतजमीन असून, त्यामध्ये भात आणि उसाचे पीक घेतले जाते. त्यांच्या शेताला लागूनच आरोपीची जमीन आहे. दोन्ही शेतांमधून जाणाऱ्या पायवाटेवरून त्यांच्यात वाद सुरू होता.
२ जुलै २०२६ रोजी फिर्यादी यांच्या पत्नी शोभा आणि नातेवाईक जानकू रामचंद्र मादार या शेतातून जात असताना आरोपीने त्यांना आपल्या शेतातील पायवाटेवरून जाऊ नका, अशी ताकीद दिली होती. मात्र, त्या पायवाटेवरून जात असताना आरोपीने दोघींना शिवीगाळ करून जातिवाचक अपशब्द वापरल्याचा तसेच कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे.
या घटनेची माहिती मिळताच फिर्यादी शेतावर पोहोचले. त्यांनी जखमी महिलांना प्रथम खानापूर येथील सरकारी रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी बेळगाव येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर खानापूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
या तक्रारीच्या आधारे खानापूर पोलिसांनी आरोपीविरोधात खुनाचा प्रयत्न आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ३ जुलै २०२६ रोजी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली होती.
जामिनासाठी आरोपीने तिसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने काही अटी घालून जामीन मंजूर केला. त्यानुसार आरोपीला एक लाख रुपयांचा वैयक्तिक हमीबंध आणि तेवढ्याच रकमेचे जामीनदारपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच साक्षीदारांना धमकावू नये आणि पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.
आरोपीच्या वतीने अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी न्यायालयात काम पाहिले.




