बेळगाव लाईव्ह : बद्धकोष्ठता अर्थात कॉन्स्टिपेशन ही समस्या केवळ वयोवृद्धांमध्येच नव्हे, तर लहान मुलांपासून तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणालाही होऊ शकते. अनेकजण या समस्येकडे सामान्य पचनाचा त्रास म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र, बद्धकोष्ठता हे स्वतंत्र आजाराचे लक्षण असण्याबरोबरच पचनसंस्थेतील विविध विकारांचे संकेतही असू शकतात. त्यामुळे या समस्येची कारणे समजून घेऊन योग्य वेळी उपचार घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले.
आरोग्यविषयक मार्गदर्शन सत्रात बोलताना डॉ. सरनोबत यांनी बद्धकोष्ठतेची विविध कारणे, त्यावरील उपाय आणि दैनंदिन जीवनशैलीत करावयाच्या बदलांविषयी माहिती दिली.
पचनक्रिया मंदावणे, आहारात फायबरचे प्रमाण कमी असणे, अनियमित जेवण, कमी पाणी पिणे आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी ही बद्धकोष्ठतेची प्रमुख कारणे आहेत. वेळेवर न जेवणे, अतिप्रमाणात किंवा अपुऱ्या प्रमाणात खाणे तसेच जेवताना बोलण्यामुळे पचनासंबंधी तक्रारी निर्माण होऊ शकतात. शरीरातील टाकाऊ पदार्थ योग्य प्रकारे बाहेर पडण्यासाठी फायबरची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे आहारात पुरेशा प्रमाणात फायबर असणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
काही व्यक्तींना मोठ्या आतड्यांशी संबंधित आजारांमुळेही बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) या विकारामध्ये कधी बद्धकोष्ठता तर कधी जुलाब अशी लक्षणे दिसू शकतात. याशिवाय डायव्हर्टिक्युलायटिस, आतड्यांमधील अडथळे किंवा गाठी यांसारख्या समस्यांमुळेही बद्धकोष्ठता उद्भवू शकते. काही औषधांच्या सेवनामुळे, विशेषतः कॅल्शियमच्या गोळ्यांमुळे, शौचास कडक होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे मूळव्याध किंवा फिशरचा त्रासही वाढू शकतो, असे त्यांनी सांगितले.
काही लोकांना शौचाला जाण्याची इच्छा वारंवार दाबून ठेवण्याची सवय असते. तसेच मूळव्याध किंवा फिशरमुळे शौचाच्या वेळी वेदना होतील या भीतीने काहीजण शौचास जाणे टाळतात. या सवयींमुळेही बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो. पोट व्यवस्थित साफ न झाल्यास संपूर्ण दिवस अस्वस्थतेत जातो. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे डॉ. सरनोबत यांनी नमूद केले.
बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी नियमित दिनचर्या पाळणे महत्त्वाचे आहे. वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे, नियमित वेळी जेवण करणे, पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. कोणत्याही अवास्तव डाएटच्या मागे न लागता योग्य प्रमाणात आहार घेणे आणि अनावश्यक ताण टाळणे आवश्यक आहे. ‘हरी, वरी आणि करी’ म्हणजेच घाई, काळजी आणि आहारातील अयोग्य सवयी या गोष्टी नियंत्रणात ठेवल्यास आरोग्य चांगले राखण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी होमिओपॅथिक उपचारांचाही उल्लेख केला. प्रत्येक व्यक्तीमध्ये बद्धकोष्ठतेची कारणे आणि लक्षणे वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे व्यक्तिनिहाय उपचारपद्धती महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, बद्धकोष्ठतेमागे गंभीर आजार असण्याची शक्यता असल्याने योग्य वैद्यकीय तपासणी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
बद्धकोष्ठता ही केवळ पोट साफ न होण्याची समस्या नसून शरीराच्या पचनसंस्थेकडून मिळणारा एक संकेत असू शकतो. त्यामुळे योग्य आहार, नियमित दिनचर्या आणि वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे हेच निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.




