belgaum

नगरसेवकांकडून श्रीनगरच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा अभ्यास

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी श्रीनगर महानगरपालिकेला भेट देऊन तेथील स्मार्ट सिटी प्रकल्प, सीसीटीव्ही नियंत्रण यंत्रणा आणि इलेक्ट्रिक बससेवेच्या संचालनाची माहिती घेतली.

या अभ्यासभेटीदरम्यान श्रीनगर स्मार्ट सिटीच्या एकात्मिक नियंत्रण व कमांड केंद्राची (ICCC) पाहणी करण्यात आली. या केंद्राच्या माध्यमातून १२ हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवले जाते. शहरातील सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने या यंत्रणेचे कामकाज कशा पद्धतीने चालते, याची माहिती नगरसेवकांनी घेतली.

तसेच श्रीनगरमधील इलेक्ट्रिक बससेवेचे संचालन, व्यवस्थापन आणि कार्यपद्धतीची माहिती जाणून घेतली. याशिवाय श्रीनगर महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज, महसुलाचे स्रोत, विविध क्षेत्रीय विभागांची रचना, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि प्रशासनाची कार्यपद्धती यांचाही अभ्यास करण्यात आला. या भेटीतून नागरी सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि महानगरपालिका प्रशासनाच्या विविध पैलूंची माहिती घेण्यात आली.

 belgaum

मात्र, या अभ्यासदौऱ्याचा खरा उद्देश केवळ श्रीनगरमधील आधुनिक सुविधांची पाहणी करण्यापुरता मर्यादित न राहता, तेथील यशस्वी उपक्रमांची बेळगावमध्ये अंमलबजावणी करणे हा असणे अपेक्षित आहे. श्रीनगरमध्ये पाहिलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांचे, अत्याधुनिक सीसीटीव्ही नियंत्रण यंत्रणेचे, इलेक्ट्रिक बससेवेचे आणि प्रशासकीय व्यवस्थापनाचे अनुकरण बेळगावमध्ये नेमके कशा पद्धतीने केले जाणार, याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

नगरसेवकांच्या या अभ्यासदौऱ्यातून बेळगाव शहराला नेमके काय मिळणार, श्रीनगरच्या धर्तीवर बेळगावचा विकास करण्यासाठी कोणते ठोस निर्णय घेतले जाणार आणि त्यांची अंमलबजावणी कधी होणार, याकडे आता बेळगावमधील सुजाण नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अभ्यासदौऱ्याचे रूपांतर प्रत्यक्ष विकासकामांमध्ये होणार का, की हा दौरा केवळ पाहणीपुरताच मर्यादित राहणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.