बेळगाव लाईव्ह : ऊसदर निश्चिती आणि साखर कारखानदारांच्या मनमानी कारभारावर आक्रमक भूमिका घेत शेतकरी नेते किसान नंदी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. साखरेचे बाजारभाव गगनाला भिडलेले असतानाही कारखानदार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यापासून रोखत असून, ही थेट शेतकरी नेत्यांना संपवण्याची अत्यंत सुनियोजित खेळी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
बेळगाव जिल्हा हा देशातील सर्वाधिक ऊस उत्पादन करणाऱ्या प्रमुख प्रदेशांपैकी एक असताना आणि प्रत्यक्षात ११ टक्क्यांहून अधिक रिकव्हरी असतानाही, कारखानदारांनी स्वतःच्या हातातील लॅबच्या माध्यमातून रिकव्हरीचे आकडे खोट्या पद्धतीने कमी दाखवून शेतकऱ्यांच्या हक्कावर दरोडा घातल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वी प्रतिटन ५,५०० रुपयांची मागणी केल्यानंतर कारखाने बंद पाडण्याची धमकी देणारी यंत्रणा, आता जिल्हाधिकारी व मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मध्यस्थीने ३,६०० रुपयांची अधिकृत दरमर्यादा निश्चित झाल्यावर स्वतःच मनमानी करत ३,८०० ते ४,००० रुपये देण्याचा आव आणत आहे. प्रत्यक्षात खुल्या बाजारात साखरेचे दर ५५ रुपयांपेक्षा जास्त असताना अधिकृत कागदपत्रांवर मात्र ४,२०० ते ४,३५० रुपयांपर्यंतचा दर स्पष्टपणे नमूद करण्यास कारखानदार धजावत नाहीत, असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला.
कारखानदारांच्या या दुहेरी आणि शोषण करणाऱ्या धोरणांमुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या नेत्यांना दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा संताप किसान नंदी यांनी व्यक्त केला आहे. कारखान्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात आता तीव्र लढा उभारण्याचा इशाराही त्यांनी याद्वारे दिला आहे.




