बेळगाव लाईव्ह: बेळगाव नगरविकास प्राधिकरणाच्या (बुडा) हद्दीत नियमांना बगल देऊन मोठ्या प्रमाणावर कृषी जमिनींचे अकृषिक रूपांतरण करण्यात आल्याचा गंभीर आरोप उत्तर कर्नाटक संघर्ष समितीचे मानद अध्यक्ष भीमाप्पा गडाद यांनी केला आहे. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या संपूर्ण प्रकरणाचे सत्य बाहेर येण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.
प्रशासकीय कार्यपद्धतीवर बोट ठेवताना गडाद यांनी स्पष्ट केले की, शासनाचे राजपत्र, अधिसूचना आणि परिपत्रकांमधील तरतुदी धाब्यावर बसवून प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील तब्बल २८ गावांमधील ७४३ एकर शेतजमिनीचे विविध कारणांसाठी रूपांतरण करण्यात आले आहे.
स्थानिक नियोजन प्राधिकरणाला कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा विश्वासात न घेता, मनमानी पद्धतीने अटी घालून हे आदेश पारित करण्यात आले आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
हा गैरव्यवहार अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी होणे आवश्यक आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत वादग्रस्त भू-रूपांतरण आदेशांना तात्काळ स्थगिती देण्यात यावी. शिवाय, या बेकायदेशीर प्रक्रियेत सामील असलेल्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गय न करता त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका भीमाप्पा गडाद यांनी पत्रकार परिषदेत मांडली.




