बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीला आळा घालण्यासाठी गोकाकमध्ये तंबाखू नियंत्रण अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे धडक मोहीम राबवली. या कारवाईत कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध १५ प्रकरणे दाखल करून दंडाची आकारणी करण्यात आली.
दि. १८ नोव्हेंबर रोजी जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष आणि पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गोकाक तालुक्यात कोटपा (COTPA) २००३ कायद्यांतर्गत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिराती करणारे तसेच शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान संबंधितांना तंबाखू नियंत्रण कायद्यातील तरतुदींची माहिती देऊन नियमांचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच तंबाखू सेवनामुळे उद्भवणारे गंभीर आरोग्यविषयक धोके आणि त्याचे दुष्परिणाम याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या मोहिमेत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या सल्लागार डॉ. श्वेता पाटील, समाजसेविका कविता राजण्णवर, तालुका आरोग्याधिकारी कार्यालयातील बी. बी. ईश्वरप्पगोळ, बाबू शेट्टप्पनवर, ईरण्णा तोरगळ तसेच पोलीस विभागाचे जी. व्ही. राठोड सहभागी झाले होते.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि नियमबाह्य तंबाखू विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशाच प्रकारच्या तपासणी मोहिमा राबवून कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.




