बेळगाव लाईव्ह:अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवांची नवीन यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये अंजलीताई निंबाळकर यांची सचिवपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडे गोवा तसेच दिव-दमण आणि दादरा-नगर हवेली या प्रदेशांची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.
सुमारे २५ सचिवांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात आले असतानाही, पक्षाने अंजलीताईंच्या कार्यावर आणि संघटनात्मक कामगिरीवर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा संधी दिली आहे. पक्षासाठी त्यांनी केलेले प्रामाणिक काम आणि योगदान याची ही पोचपावती मानली जात असून, यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोणतीही जबाबदारी निष्ठेने आणि तत्परतेने पार पाडणे हे ताईंचे वैशिष्ट्य राहिले आहे. दिवस-रात्र, सण-उत्सव न पाहता पक्षकार्य करणे आणि पदापेक्षा विचारधारा व प्रामाणिक कामाला प्राधान्य देणे, ही त्यांची कार्यपद्धती वरिष्ठ नेत्यांच्याही पसंतीस उतरली आहे. “पदे येतात आणि जातात; मात्र प्रामाणिक काम आणि विचारधारा महत्त्वाची असते,” हा संदेश त्यांच्या कार्यातून मिळतो.
या निवडीबद्दल खानापूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अंजलीताई निंबाळकर यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.




