बेळगाव लाईव्ह: कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २ ते ११ डिसेंबर २०२६ या कालावधीत सुवर्ण विधानसौध येथे होणार असून, या पार्श्वभूमीवर अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी हेस्कॉमने (HESCOM) विशेष तयारी केली आहे.
अधिवेशनाच्या दहा दिवसांच्या कालावधीत लोकप्रतिनिधी, मंत्री, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना वीजपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी वीज वितरण यंत्रणेची प्रतिबंधात्मक देखभाल, तांत्रिक तपासणी आणि आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.
हेस्कॉम आणि कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड (KPTCL) यांच्या संयुक्त विद्यमाने ही देखभाल मोहीम राबविण्यात येत आहे. १४ नोव्हेंबर रोजी सुवर्ण विधानसौधला वीजपुरवठा करणाऱ्या फीडरच्या देखभालीचे काम करण्यात आले. याबाबत नागरिकांना पूर्वसूचना देण्यात आली होती.
बसवेश्वर सर्कल, हरिकाका कंपाऊंड आणि येडियुरप्पा रोड या प्रमुख फीडरची तपासणी, प्रतिबंधात्मक देखभाल आणि आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. संभाव्य तांत्रिक बिघाड टाळून अधिवेशन काळात अखंडित वीजपुरवठा ठेवण्याचा यामागील उद्देश आहे.
दरम्यान, सुवर्ण विधानसौधचे वीज बिल नियमितपणे निर्धारित मुदतीत भरले जात असून, कोणतीही थकबाकी नाही. त्यामुळे वीज बिल न भरल्यामुळे सुवर्ण विधानसौधचे कोणतेही वीज कनेक्शन तोडण्यात आलेले नाही, असे हेस्कॉमने स्पष्ट केले आहे.
अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक त्या सर्व तांत्रिक उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित हुेस्कॉम आणि केपीटीसीएल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. प्रतिबंधात्मक देखभाल, नियमित तपासणी आणि तातडीच्या प्रतिसादाच्या माध्यमातून विश्वासार्ह वीजपुरवठा देण्यास हेस्कॉम कटिबद्ध असल्याचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत एन. यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे




