बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील पारंपरिक कलाकुसर, प्रसिद्ध वडगाव – शहापूर साड्या, फाउंड्री उद्योग आणि शेतीमालाला थेट परदेशी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता टपाल खाते मदतीला धावून आले आहे. बेळगाव डाक विभाग आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित आयात-निर्यातदारांच्या विशेष संमेलनात जिल्ह्यातील व्यापाराच्या या नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पोस्टाच्या बदलत्या भूमिकेचे कौतुक केले. पत्रव्यवहारापुरते मर्यादित न राहता भारतीय डाक विभागाने ‘डाक घर निर्यात केंद्रा’च्या माध्यमातून स्थानिक कारागीर आणि उद्योजकांना जागतिक बाजारपेठेशी जोडले आहे.
सोपी कागदपत्र प्रक्रिया, ई-कॉमर्सचे पाठबळ आणि अत्यंत माफक दरात दोनशेहून अधिक देशांमध्ये माल पाठवण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने लघु व मध्यम उद्योगांचा प्रवास सोपा झाला आहे. जिल्ह्यातील निर्यातदारांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बेळगाव विभागाच्या वरिष्ठ डाक अधीक्षक आरुषी शर्मा पी. एल. श्रीदेव आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष स्वप्नील शहा यांनी भूषवले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक सत्यनारायण भट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच धारवाड प्रादेशिक कार्यालयाचे सहाय्यक संचालक आर. वाय. मधुसागर, चेंबरच्या डाक समितीचे अध्यक्ष रोहित कपाडिया, बेंगळुरू कार्यालयाचे आंतरराष्ट्रीय डाक निरीक्षक रूपेश कुमार के. एन., एचसीएसएसचे अध्यक्ष के. एल. रमेश आणि धारवाड येथील सहाय्यक संचालक किरण यांनी उपस्थित राहून उद्योजकांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे बेळगावचे अभियांत्रिकी साहित्य, खाद्यपदार्थ आणि हस्तकला वस्तू बर्लिन, पॅरिस आणि अमेरिकेतील बाजारपेठेत सहजपणे विक्रीसाठी पाठवता येणार आहेत.




