belgaum

गोजग्याचा ध्यानेश चमकला! मिनी ऑलिंपिकसाठी निवड

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : ग्रामीण भागातील छोट्याशा गावातून आलेल्या एका होतकरू खेळाडूने आपल्या अफलातून खेळाच्या जोरावर फुटबॉल विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. बेळगाव तालुक्यातील गोजगे गावचा रहिवासी आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये नववीत शिकणारा ध्यानेश संदीप बामणे याने आपल्या जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर फुटबॉल क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

ध्यानेशची जिल्हा फुटबॉल संघात निवड झाली असून, त्यानंतर लगेचच बंगळुरू येथे होणाऱ्या २०२६ च्या कर्नाटक मिनी ऑलिंपिक स्पर्धेतील १४ वर्षांखालील गटासाठीही त्याची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ध्यानेश नुकताच बंगळुरूकडे रवाना झाला आहे.

ध्यानेशच्या या यशामागे त्याची मैदानावरील मेहनत आणि सातत्यपूर्ण सराव महत्त्वाचा ठरला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ५८ व्या फादर एडी फुटबॉल स्पर्धा २०२६ मध्ये त्याने आपल्या खेळाची चमक दाखवून दिली. उपांत्य फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत आपल्या संघासाठी निर्णायक योगदान देत त्याने विजयात मोलाचा वाटा उचलला.

 belgaum

विशेष म्हणजे, फादर ए डी स्पर्धेत जैन हेरिटेज संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात दुसऱ्या टप्प्यात मिळालेल्या फ्री किकवर ध्यानेशने केलेल्या अप्रतिम गोलने सामन्याचे चित्रच बदलले. त्याच्या या गोलचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अवघ्या एका आठवड्यात या व्हिडिओला देशभरातील जवळपास १० लाख म्हणजेच १ मिलियन फुटबॉल चाहत्यांनी पाहिले, तर दोन लाखांहून अधिक लोकांनी त्याला पसंती दर्शवली. एका छोट्याशा गावातील विद्यार्थ्याच्या खेळाची चर्चा देशभरातील फुटबॉलप्रेमींमध्ये होऊ लागली.

ध्यानेश हा गोजगे येथील संदीप बामणे यांचा मुलगा असून, संदीप बामणे हे खाजगी पतसंस्थेत शाखाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच तो गोवा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक केदार गुंडू बामणे यांचा नातू आहे.

त्याच्या फुटबॉल प्रवासात ज्योती सेंट्रल स्कूलचे प्रशिक्षक मनोज जाधव, रेग फसीचे रेगो सर आणि वडील संदीप बामणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

गावातील मैदानावर सुरू झालेला ध्यानेशचा हा प्रवास आता राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत पोहोचला आहे. सोशल मीडियावर गाजलेला त्याचा फ्री किक गोल आणि त्यानंतर मिळालेली मिनी ऑलिंपिकची संधी यामुळे गोजगे गावासह बेळगावच्या क्रीडावर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. बंगळुरू येथे होणाऱ्या मिनी ऑलिंपिक स्पर्धेतही ध्यानेश अशीच चमकदार कामगिरी करून यश मिळवेल, अशी अपेक्षा फुटबॉलप्रेमी, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

एका छोट्याशा गावातून सुरू झालेली ही फुटबॉलची भरारी भविष्यात मोठ्या यशापर्यंत पोहोचो, यासाठी ध्यानेशला सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.