बेळगाव लाईव्ह : शाळा सुटते, वर्ग बदलतात, मित्र-मैत्रिणींच्या वाटा वेगळ्या होतात… प्रत्येकजण आपापल्या आयुष्याच्या प्रवासात व्यस्त होतो. पण शाळेच्या त्या आठवणी मात्र मनाच्या एका कोपऱ्यात कायम घर करून राहतात. वर्गातील गमतीजमती, मित्रांसोबत केलेली मस्ती, शिक्षकांचा ओरडा आणि त्यांनी दिलेले संस्कार… या सगळ्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला, तो तब्बल १६ वर्षांनंतर!
निमित्त होते श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल, हलशी येथील २००९-१० च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे. अनेक वर्षांनंतर शाळेच्या त्याच प्रांगणात एकत्र आलेले मित्र-मैत्रिणी एकमेकांना भेटताच जुन्या आठवणींच्या विश्वात रमून गेले. कुणी जुन्या वर्गातील किस्से सांगत होते, तर कुणी शाळेतील धमाल क्षण आठवत होते. काळ पुढे सरकला, प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक बदल झाले; मात्र मैत्रीचा तो जुना ओलावा आणि शाळेप्रती असलेली आपुलकी आजही तशीच असल्याचे या मेळाव्यातून दिसून आले.
या भेटीला आणखी खास बनवले ते गुरुजनांच्या उपस्थितीने! ज्या शिक्षकांनी हात धरून अक्षरओळख करून दिली, शिस्त शिकवली, चुकांवर रागावले आणि आयुष्याला योग्य दिशा दिली, त्या गुरुजनांना पुन्हा एकदा भेटण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. गुरुजनांचे आशीर्वाद घेताना अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद, तर मनात जुन्या आठवणींचा भावनिक ओलावा दिसत होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी मुख्याध्यापक ए. आर. देसाई सर यांनी शाळेच्या स्थापनेपासूनचा प्रेरणादायी प्रवास उलगडला. सुरुवातीला एका मठामध्ये सुरू झालेल्या शाळेला दानशूर व्यक्तींनी जागा दिली आणि अनेकांच्या योगदानातून शाळेची इमारत उभी राहिली. शाळेच्या जडणघडणीमागील हा संघर्ष आणि योगदान ऐकताना माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या इतिहासाबद्दल अभिमान व्यक्त केला.
माजी मुख्याध्यापक किरण देसाई सर यांनी केवळ यशस्वी होण्यापेक्षा एक चांगला माणूस म्हणून जगणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांची शिकवण दिली. तर माजी मुख्याध्यापक बी. आर. बुवाजी सर यांनी शाळेतील मित्र-मैत्रिणी आणि गुरुजनांशी असलेले नाते कायम जपण्याचे आवाहन केले.
मुख्याध्यापक भरमाणी पाटील सर यांनी शाळेच्या सध्याच्या प्रगतीचा आढावा घेत माजी विद्यार्थ्यांनी देणगी आणि विविध कामांच्या माध्यमातून दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य असेच कायम राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. यल्लाप्पा पाटील, हनमंत पाटील, दिनेश जाधव, मलप्रभा मेरवा, अश्विनी पाटील, प्रवीण देसाई, संतोष पाटील आणि आकाश पाटील यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांनी केलेले संस्कार, वर्गातील गंमतीजमती, मित्रांसोबत घालवलेले दिवस आणि शाळेने दिलेली जीवनाची शिदोरी यांचा उल्लेख करताना अनेकजण भावूक झाले.
‘शाळेने आम्हाला केवळ शिक्षण दिले नाही, तर आयुष्य जगण्याची दिशा दिली. माणुसकी, संस्कार आणि नाती जपण्याची शिकवण दिली. त्यामुळे शाळेचे ऋण कधीही विसरता येणार नाही,’ अशा भावना व्यक्त करत भविष्यात शाळेला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास सर्व माजी विद्यार्थी एकजुटीने शाळेच्या पाठीशी उभे राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रियांका काकतकर यांनी केले. यावेळी शाळेतील माजी शिक्षक, माजी कर्मचारी, विद्यमान शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे (SDMC) अध्यक्ष उपस्थित होते.
सोळा वर्षांचा काळ सरला, आयुष्याची गणिते बदलली, जबाबदाऱ्या वाढल्या; पण शाळेच्या आठवणी मात्र ताज्याच राहिल्या. या स्नेहमेळाव्याने केवळ जुन्या मित्रांची भेट घडवली नाही, तर गुरुजनांप्रती कृतज्ञता आणि आपल्या शाळेसाठी काहीतरी करण्याची नवी उमेदही दिली. पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणात उमटलेला हास्याचा आणि आठवणींचा हा गजर प्रत्येकाच्या मनात कायमचा घर करून गेला.




