बेळगाव लाईव्ह : बेळगाव-महाराष्ट्र सीमा प्रश्नावर कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली असून, या संदर्भात महाजन अहवालाचे तेच तुणतुणे कायम गायिले आहे. महाजन अहवाल हाच अंतिम असून, सीमा प्रश्नात कोणाकडूनही बदल करणे शक्य नाही, असे ठाम विधान त्यांनी केले आहे.
बेळगाव सीमा प्रश्नासह राज्याच्या जमीन, पाणी आणि भाषेच्या हक्कांबाबत बोलताना पाटील यांनी कर्नाटकची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. महाजन अहवाल अथवा जैसे थे स्थिती हाच कन्नडिगांचा अंतिम निर्णय असल्याचे सांगत, सीमाभागातील कन्नड भाषिकांच्या बाजूने उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले. जलवाटपाच्या प्रश्नात राज्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत, याविरोधात जागरूक नागरिकांनी संघर्ष सुरू ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, आगामी सुवर्णसौध अधिवेशन केवळ आंदोलन, निदर्शने आणि बाहेरील मंडपांपुरते मर्यादित राहू नये, तर उत्तर कर्नाटकासह संपूर्ण राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर ठोस उपाययोजना करणारे व्यासपीठ ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कन्नड भाषेला होत असलेल्या दुय्यम वागणुकीच्या पार्श्वभूमीवर सुवर्णसौधमध्ये आमदारांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच सुवर्णसौध परिसरात नाडदेवी भुवनेश्वरीची मूर्ती उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

बासवण्णा यांच्या संदर्भातील वादग्रस्त पुस्तकावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बासवण्णा यांना सरकारने ‘सांस्कृतिक नायक’ म्हणून घोषित केले असून, त्यांचे तत्त्वज्ञान, विचारसरणी आणि अनुभव मंटपाचा संदेश संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी म्हटले.
एकूणच, सीमा प्रश्नावर महाजन अहवालाचीच भूमिका कायम ठेवत एच. के. पाटील यांनी पुन्हा एकदा कर्नाटकची ठाम भूमिका मांडली आहे.
नेमका महाजन आयोग काय आहे ? हे जाणून घेण्यासाठी बेळगाव लाईव्ह चा हा व्हिडिओ पहा खालील लिंक क्लिक करून




