बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजवले नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यापूर्वी महापालिकेत कोणाची सत्ता आहे बेळगावच्या भाजप आमदारांनी पहावे, असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी लगावला.
शनिवारी बेळगाव शहरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप आमदाराने यांनी दिल्याबाबत विचारले असता जारकीहोळी यांनी भाजपवर निशाणा साधला.
मागील भाजप सरकारच्या काळात दक्षिण मतदारसंघासाठी ७० टक्के निधी घेण्यात आला, तर उत्तर मतदारसंघाला निधी देण्यात आला नाही, असा आरोप त्यांनी केला. प्रत्येक विषयावर राष्ट्रपती आणि राज्यपालांना पत्र लिहिणाऱ्या भाजप नेत्यांनी केंद्र सरकारकडून राज्याला मिळणाऱ्या निधीबाबतही आवाज उठवावा. जलजीवन मिशन योजनेसाठी केंद्र सरकारकडून सुमारे १० हजार कोटी रुपये येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेने कर वसुली वाढवावी
बेळगाव महापालिकेतील करगळती रोखण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी कर संकलन व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. कर वसुली अधिक प्रभावी करून महापालिकेने स्वतःचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
साखरेच्या दरानुसार ऊस उत्पादकांना मिळणार वाढीव दर
ऊस उत्पादकांच्या आंदोलनानंतर प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित करण्यात आला होता. आता साखरेच्या विक्री किमतीनुसार शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम देण्याचे लाभांश वाटपाचे सूत्र साखर कारखान्यांकडून अवलंबले जात आहे, अशी माहिती जारकीहोळी यांनी दिली.
सुरुवातीला साखरेचा दर ४५ रुपये प्रतिकिलो गृहीत धरून प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित करण्यात आला होता. आता साखरेच्या ५० रुपये प्रतिकिलो दराच्या आधारावर ऊसदर जाहीर केला जात आहे. साखरेची विक्री ५० रुपयांपेक्षा अधिक दराने झाल्यास शेतकऱ्यांना प्रतिटन ४,००० रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
ऊसातील साखर उताऱ्याच्या प्रमाणावर दर निश्चित होत असल्याने सर्व जिल्ह्यांमध्ये एकसमान दर देणे शक्य नाही. बेळगावसह विविध जिल्ह्यांमध्ये ऊस खरेदी दरात फरक असून, कारखान्यांमध्ये ऊस खरेदीसाठी स्पर्धा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोकाक आणि चिक्कोडी जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव
बेळगाव जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर बोलताना जिल्ह्याचे विभाजन व्हावे, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. गोकाक आणि चिक्कोडी हे स्वतंत्र जिल्हे करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र बैलहोंगल, अथणी, रामदुर्ग यांसह अनेक तालुक्यांतूनही स्वतंत्र जिल्ह्याची मागणी होत आहे. त्यामुळे जिल्हा विभाजनाबाबत सर्वमान्य निर्णय घेण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
एकूणच, बेळगाव शहरातील रस्त्यांची दुरवस्था, महापालिकेची आर्थिक स्थिती, ऊसदराचा प्रश्न आणि जिल्हा विभाजन या मुद्द्यांवर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भाजप आमदारावर यांच्यावर निशाणा साधला.




