बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला पारंपरिक वाळू व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे. यासंदर्भात समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
खानापूर तालुक्यात गेल्या ८० वर्षांपासून वाळू व्यवसाय सुरू होता. या व्यवसायावर तालुक्यातील हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, राजकीय हेतूने प्रेरित होऊन गेल्या दोन वर्षांपासून हा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाळू व्यावसायिकांसह वीटभट्टी कामगार, सेंट्रिंग कामगार, गवंडी तसेच लहान-मोठे बांधकाम कंत्राटदार बेरोजगार झाले आहेत.
शेजारील कित्तूर, बेळगाव ग्रामीण, वंटमुरी, गोकाक, यमकनमर्डी, चिकोडी, जोयडा आणि हल्याळ या तालुक्यांमध्ये वाळू व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. हल्याळ येथे दररोज हजारो टन मँगनीजचे उत्खनन सुरू असताना केवळ खानापूर तालुक्यातील पारंपरिक वाळू व्यवसायावरच बंदी का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
येत्या दोन-तीन महिन्यांत तालुक्यात मोठ्या प्रमाणात यात्रा-जत्रा होणार आहेत. काटणगळी, बीदरभावी, कारलगा, नेर्से आणि कापोली-मडवाळ या गावांमध्ये ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रा व उत्सव होणार आहेत. यानिमित्ताने गावागावांत घरबांधणी आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मात्र, वाळू उपलब्ध नसल्याने नागरिकांना एका लोडसाठी ४० ते ४५ हजार रुपये मोजून बेकायदेशीररीत्या वाळू खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
कोणतेही ठोस कारण नसताना केवळ खानापूर तालुक्यातील वाळू व्यवसाय बंद ठेवणे अन्यायकारक आहे. प्रशासनाने या प्रश्नात तातडीने लक्ष घालून, जाचक अटी न घालता आणि व्यावसायिकांवर खोटे गुन्हे दाखल न करता घरबांधणी व स्थानिक गरजांसाठी पारंपरिक पद्धतीने वाळू व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी संजीव पाटील, रुक्मणा झुंझरकर, भीमसेन कोलाप्पा कंबळकर, गुलाबचंद एम., राजेश आडवाड, मुरलीधर जी. पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, राजेंद्र कुलम, रवींद्र शिंदे, बी. बी. पाटील, कृष्णा कुंभार, व्ही. एस. पारिशवाडकर आदी उपस्थित होते.




