बेळगाव लाईव्ह: ना सोबत कोणी नातेवाईक, ना मदतीला धावून येणारे आपले माणूस… फुटपाथवर पतीचा मृतदेह आणि त्याच्या शेजारी असहायपणे रडणारी पत्नी! हे हृदय हेलावणारे दृश्य पाहून माजी महापौर विजय मोरे आणि सोशल रेस्क्यू टीमने तातडीने मदतीचा हात पुढे केला. केवळ अंत्यसंस्कारच नव्हे, तर दुःखाच्या या प्रसंगी त्या महिलेला आधार देत तिला मूळ गावी पोहोचविण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली.
रेल्वे स्टेशन रोड परिसरात गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील एक वारकरी आपल्या पत्नीसह वास्तव्यास होते. दरम्यान, काल त्यांचे निधन झाले. पतीच्या मृत्यूनंतर मदतीसाठी जवळचे कोणीही नसल्याने पत्नी पूर्णपणे निराधार झाली होती. फुटपाथवर पतीच्या मृतदेहाशेजारी बसून ती आक्रोश करत होती.
या घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलिसांनी माजी महापौर विजय मोरे यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच विजय मोरे यांनी सोशल रेस्क्यू टीमसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेहाची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यावेळी हे दाम्पत्य छत्रपती संभाजीनगर येथील असल्याचे समोर आले.
यानंतर मृत व्यक्तीवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी विजय मोरे आणि त्यांच्या टीमने स्वीकारली. बेळगाव महापालिकेच्या शववाहिका विभागातील कर्मचारी निशार समशेर आणि संजय मेट्री तसेच स्मशानभूमी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मृतदेह सदाशिवनगर स्मशानभूमीत नेण्यात आला. तेथे धार्मिक विधी पार पाडून सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

या सेवाकार्यात गंगाधर पाटील, पद्मप्रसाद हूली, अॅलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, राजू टक्कर, शशिकांत अंबेवाडीकर आणि शमसिंग राजपूत यांनीही सक्रिय सहभाग घेतला. पतीच्या निधनाने कोलमडलेल्या महिलेला सर्वांनी धीर दिला. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत पतीच्या अंत्यविधीसाठी मदत केली. तसेच तिला पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथील मूळ गावी पाठविण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याची जबाबदारीही घेतली.
जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे, याची जाणीव करून देणारी ही घटना! ज्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी कोणीही नव्हते, अशा एका महिलेच्या मदतीला धावून जात विजय मोरे आणि सोशल रेस्क्यू टीमने माणुसकीचे खरे दर्शन घडविले. एका अनोळखी व्यक्तीला सन्मानाचा अखेरचा निरोप आणि त्याच्या पत्नीला आधार देण्याचे त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.




