बेळगाव लाईव्ह : कंग्राळी बुद्रुक (ता. जि. बेळगाव) येथे सुरू असलेल्या श्री महालक्ष्मी यात्रोत्सवाचे प्रभावी आणि सातत्यपूर्ण कव्हरेज केल्याबद्दल, तसेच संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ, मुंबईच्या प्रदेश कार्यकारिणीवर उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी यांचा यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कंग्राळी (बु.) गावची ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 28 एप्रिलपासून मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. तब्बल 43 वर्षांनंतर भरत असलेल्या या यात्रेच्या पूर्वतयारीपासून ते विविध कार्यक्रमांपर्यंतच्या प्रत्येक घडामोडींना बेळगाव लाईव्हने व्यापक प्रसिद्धी दिली आहे. यामुळे यात्रोत्सवाच्या यशस्वी आयोजनास मोठी मदत झाल्याची भावना यात्रा कमिटीने व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी यात्रा कमिटीतर्फे संपादक प्रकाश बेळगोजी यांना मानाचा शेला घालून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बेळगाव लाईव्हच्या कार्याचे कौतुक करत बेळगोजी यांचे अभिनंदन केले.याचवेळी बेळगाव लाईव्ह परिवारातील ज्येष्ठ पत्रकार प्रसाद प्रभू तसेच कॅमेरामन नागेश कालिंग यांचाही सन्मान करण्यात आला.सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत संपादक प्रकाश बेळगोजी यांनी यात्रा कमिटीचे आभार मानले आणि यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.





