बेळगाव लाईव्ह : गेल्या दोन दिवसांत पतंग उडवताना घडलेल्या दोन दुर्दैवी घटनांनंतर बेळगाव पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या निर्देशानुसार शहरातील विविध भागांमध्ये मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान काही दुकानांमधून मांजा जप्त करण्यात आला असून, भविष्यात अशा धोकादायक घटना घडू नयेत यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी वडगाव परिसरात पतंग उडवताना इमारतीवरून खाली पडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांत गांधीनगर परिसरातील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ धोकादायक मांजाच्या दोऱ्याने दुचाकीस्वार ध्रुव कारजगी याचा गळा चिरला गेला आणि त्याचा मृत्यू झाला. १९ वर्षीय ध्रुव हा महांतेशनगर येथील रहिवासी होता. सलग घडलेल्या या घटनांमुळे पतंग उडवताना नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गांधीनगर येथील घटनेनंतर धोकादायक मांजाच्या विक्रीवर आणि वापरावर बंदीची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरली होती. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी मांजाविरोधातील बंदीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देत पोलिसांना तपासणी आणि कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील विविध पोलीस स्थानकांच्या हद्दीत पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
शहरातील विविध भागांमधील पतंग आणि मांजा विक्रीच्या दुकानांमध्ये पोलिसांनी तपासणी केली. दुकानांमध्ये धोकादायक मांजा विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे का, याची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आढळून आलेला मांजा पोलिसांनी जप्त केला आहे. धोकादायक मांजा विक्री करताना कोणी आढळल्यास संबंधित विक्रेत्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
केवळ मांजा विक्रेत्यांवरच नव्हे, तर धोकादायक मांजाचा वापर करून पतंग उडवणाऱ्यांवरही पोलिसांची नजर राहणार आहे. विशेषतः माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीसह शहरातील विविध भागांमध्ये पोलीस याबाबत लक्ष ठेवून आहेत.
गेल्या दोन दिवसांतील या घटनांनंतर पोलिसांनी घेतलेल्या कारवाईमुळे धोकादायक मांजाच्या विक्रीला आळा घालण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये आणि पतंगाशी संबंधित दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी शहरातील सर्व पोलीस स्थानकांकडून तपासणी आणि कारवाईची मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे.





