belgaum

गणपत गल्ली, कडोलकर गल्लीत पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहरातील गणपत गल्ली आणि कडोलकर गल्ली परिसरात रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका आणि रहदारी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम राबवली.

शनिवारी खूटपासून गणपत गल्लीमार्गे नरगुंदकर भावे चौकापर्यंतच्या रस्त्यावर फळ विक्रेते, हातगाडीवाले आणि काही दुकानदारांकडून रस्त्यावरच व्यवसाय केला जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. विशेषतः बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना आणि वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारीही करण्यात येत होत्या.

या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी महापालिकेचे अधिकारी आणि रहदारी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली. रस्त्यावर मांडण्यात आलेले साहित्य आणि विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या.

 belgaum

विशेष म्हणजे, यापूर्वीही गणपत गल्ली परिसरात महापालिका आणि रहदारी पोलिसांनी संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम राबवून हातगाड्या व अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई केली होती. मात्र, काही दिवसांनंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होत असल्याचे दिसून येत आहे.

केवळ अतिक्रमण हटवून प्रश्न सुटणार का?

महापालिका आणि पोलिसांनी वारंवार कारवाई करूनही विक्रेते पुन्हा रस्त्यावर व्यवसाय थाटत असतील, तर या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची जबाबदारी निश्चित करून नियमित देखरेख ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

एकीकडे बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोकळा रस्ता हवा आहे, तर दुसरीकडे विक्रेत्यांनाही व्यवसायासाठी योग्य जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ तात्पुरती कारवाई न करता या परिसरातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.