बेळगाव लाईव्ह : वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाला हातभार लावण्याचा आदर्श कंग्राळी खुर्द येथील तरुण अभियंते महेश मल्लू मोहनगेकर यांनी घालून दिला. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी गावातील सरकारी ग्रंथालयाला विविध विषयांवरील सुमारे दहा हजार रुपये किमतीची पुस्तके भेट दिली. त्यांच्या या विधायक उपक्रमाचे शिक्षणप्रेमी नागरिकांतून कौतुक होत आहे.
गावातील सरकारी ग्रंथालयात आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी टी. डी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येकाने शक्य तितका विधायक उपक्रम राबवून समाजाला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर महेश मोहनगेकर यांचे वडील मल्लू मोहनगेकर यांच्या हस्ते ग्रंथपाल मधू पाटील यांच्याकडे पुस्तकांचा संच सुपूर्द करण्यात आला. यामध्ये पानिपत, ययाती, छावा, स्वामी विवेकानंद यांसारख्या कादंबऱ्या, स्पर्धा परीक्षा व सामान्य ज्ञानाची पुस्तके, इंग्रजी स्पीकिंग कोर्सची पुस्तके, छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी असलेल्या दहा वीर मावळ्यांची चरित्रे तसेच विविध बोधकथा आदी पुस्तकांचा समावेश आहे.
याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नित्यपूजेसाठी १,१११ रुपयांची देणगीही देण्यात आली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना महेश मोहनगेकर यांनी या पुस्तकांचा शालेय विद्यार्थ्यांसह गावातील तरुण पिढीने मोठ्या प्रमाणात उपयोग करावा, असे आवाहन केले. तसेच, यापुढेही मोहनगेकर परिवाराच्या वतीने ग्रंथालयाला पुस्तके व शैक्षणिक साहित्य देत राहण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

मराठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक गोपाळ लाड यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाला माजी सदस्य प्रशांत पाटील, एसडीएमसी अध्यक्ष विक्रम मुतगेकर व त्यांचे सहकारी, मनोज मोहनगेकर, मराठी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, ग्रंथपाल मधू पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ग्रंथालय रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.





