बेळगाव लाईव्ह: शहरात हेरॉईनची अवैध विक्री करणाऱ्या एका तरुणावर सेंट्रल क्राईम ब्रँच (CCB) पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. आरोपीकडून 10.77 ग्रॅम हेरॉईनसह एक मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संदीप विजय अनगोळकर (वय 27, रा. बसवन गल्ली, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोबर 2026 रोजी खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसवन गल्ली परिसरात एका व्यक्तीकडून हेरॉईनची विक्री सुरू असल्याची माहिती CCB पोलिसांना मिळाली. त्यानुसार CCBचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.
या कारवाईदरम्यान संदीप अनगोळकर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 10.77 ग्रॅम हेरॉईन पावडर भरलेल्या 122 छोट्या पुड्या जप्त करण्यात आल्या. या हेरॉईनची किंमत सुमारे 2 लाख 15 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच सुमारे 500 रुपये किमतीचा नोकिया कीपॅड मोबाईल फोनही जप्त करण्यात आला.

चौकशीदरम्यान आरोपीने सदर हेरॉईन मुंबईतील सायन-कोळीवाडा परिसरातील ‘अम्मा’ नावाच्या महिलेकडून आणल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
या प्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 86/2026 दाखल करण्यात आला असून, NDPS Act कलम 21(b) अंतर्गत आरोपींसह संबंधित महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात केलेल्या या कारवाईबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि DCP यांनी CCBचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक तसेच त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे.





