बेळगाव लाईव्ह: पुण्यात होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी बेळगाव सीमाप्रश्नाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. त्यांनी सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांची बिनशर्त जाहीर माफी मागावी आणि संमेलनाध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली.
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, “बेळगाव काय पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारे सगळे प्रदेश महाराष्ट्रात आणणार का? सीमाभागातील मराठी भाषकांनी ज्या राज्यात राहतात, तेथील भाषा आणि संस्कृती स्वीकारावी,” अशा आशयाचे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे गेल्या सात दशकांपासून महाराष्ट्रात विलीनीकरणासाठी लढा देणाऱ्या सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्याची प्रतिक्रिया समितीने व्यक्त केली.
यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासारख्या प्रतिष्ठित व्यासपीठाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या व्यक्तीकडून सीमावासीयांच्या भावना दुखावणारे विधान होणे दुर्दैवी आहे. १९४६ मध्ये बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडण्यात आला होता. या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आणि सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या संघर्षाचा विचार न करता करण्यात आलेले विधान निषेधार्ह असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. लिंबाळे यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन सीमाभागातील मराठी भाषिकांची बिनशर्त माफी मागावी. तसेच संमेलनाध्यक्षपदाचा स्वतःहून राजीनामा द्यावा, अन्यथा साहित्य महामंडळाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. साहित्य परिषद आणि महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल न घेतल्यास येळ्ळूरसह संपूर्ण सीमाभागात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला.

या निषेध बैठकीस ज्येष्ठ नेते व्ही. डी. पाटील सर, दौलत कुगजी, नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, माजी उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, रमेश मेणसे, मनोहर अ. पाटील, नागेंद्र पाखरे, अनिल पु. पाटील, दीपक कर्लेकर, गोपाळ शहापूरकर, शिवाजी जाधव, सुनील पाटील, एच. बी. पाटील सर, पुंडलिक घाडी, गोपाळ बिर्जे, अभिजित पाटील, मुकेश पाटील, मधु पाटील, निखिल पाटील, ज्ञानेश पाटील, शुभम नांदवडेकर, गौरेश कुगजी, सौरभ जाधव, मयूर कदम यांच्यासह येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




