belgaum

संविधानाच्या मूलभूत ढाच्याला कुणीही धक्का पोहोचवू शकत नाही : प्रा. सलोनी पाटील

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : भारतीय संविधान हा लोकशाहीचा जिवंत दस्तऐवज आहे. संविधानाची निर्मिती करणे जितके कठीण होते, त्यापेक्षाही त्यात बदल करणे अधिक कठीण आहे. त्यामुळे संविधानाच्या मूलभूत ढाच्याला कुणीही धक्का पोहोचवू शकत नाही, असे मत भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या प्रा. सलोनी शिवराज पाटील यांनी व्यक्त केले.

प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने शहीद भगतसिंग सभागृहात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी ‘भारतीय संविधान’ या विषयावर प्रा. सलोनी पाटील बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद मेणसे होते.

प्रा. पाटील पुढे म्हणाल्या की, भारतीय संविधानात मूलभूत हक्क आणि कर्तव्यांसह अनेक महत्त्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. संविधानाने नागरिकांना अनेक मूलभूत हक्क प्रदान केले असून मतदानाचा अधिकार हा त्यापैकी एक महत्त्वाचा अधिकार आहे. भारतीय संविधानात ४८० कलमे, २५ भाग आणि १२ अनुसूची असल्याने ते जगातील सर्वांत मोठे लिखित संविधान म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांना संविधानाची अधिक माहिती मिळावी, त्याबद्दल आदर आणि सन्मानाची भावना निर्माण व्हावी, यासाठी विविध अभ्यासक्रमांमध्ये संविधानाचा विषय समाविष्ट करण्यात आला आहे.

 belgaum

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य आनंद मेणसे म्हणाले की, अनेक विचारांचा आणि भारतीय समाजातील विविध घटकांचा विचार करून लोकशाही पद्धतीने भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली. संविधानाने सर्व नागरिकांना समान हक्क दिले असले, तरी अलीकडच्या काळात हे अधिकार नाकारण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. घटनेने सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार दिला असतानाही गरीब जनतेला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनिल आजगावकर यांनी केले, तर जे. पी. अगसीमनी यांनी आभार मानले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.