belgaum

लोकशाहीच्या व्यासपीठावरून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर फडणवीसांचे मौन!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : भाजपच्या वतीने ‘लोकशाही वाचवा, अराजकता दूर करा’ या अभियानांतर्गत बेळगावातील धर्मनाथ भवन येथे शनिवारी प्रबुद्ध नागरिकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोकशाही, संविधान आणि देशाच्या सुरक्षेवर भाष्य करताना त्यांनी मराठी आणि कन्नड या भगिनी भाषा असल्याचे सांगत भाषिक सलोख्याचा संदेश दिला. मात्र, सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारी भाषिक सक्ती, त्यांच्यावरील अन्याय आणि मराठी संस्कृतीवरील दबाव याबाबत त्यांनी एक शब्दही न काढल्याने सीमावासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कन्नड भाषेतून केली. मराठी आणि कन्नड या भाषा वेगवेगळ्या असल्या, तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये वेगळी असली, तरी आपण सर्व एक आहोत आणि आपल्यात कोणताही भेदभाव नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. देशाच्या संविधानाचा आणि लोकशाही व्यवस्थेचा अपमान करण्याचे काम काँग्रेस करत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगत अशा शक्तींविरोधात एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या काही वर्षांत प्रगती केली असून, आगामी काळात भारत जागतिक स्तरावर दुसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

 belgaum

मात्र, बेळगावसह संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिकांच्या दृष्टीने या कार्यक्रमातून अपेक्षित असलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सीमाप्रश्न आणि मराठी जनतेवर होणारी भाषिक सक्ती हा होता. सीमाभागात मराठी आणि कन्नड भाषिक जनतेमध्ये कोणताही मूलभूत वाद नसताना प्रशासनाच्या पातळीवर कन्नड भाषेची सक्ती केली जात असल्याची तक्रार मराठी भाषिकांकडून सातत्याने केली जाते. शासकीय व्यवहारांमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान, मराठी संस्कृतीवर येणारा दबाव आणि भाषेच्या कारणावरून मराठी माणसाला सहन कराव्या लागणाऱ्या अडचणी याबाबत सीमाभागातून वारंवार आवाज उठवला जात आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सीमाभागातील या समस्या महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंतही अनेकदा पोहोचवण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकशाही आणि नागरिकांच्या अधिकारांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या याच व्यासपीठावरून फडणवीस यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या घटनात्मक आणि भाषिक अधिकारांचा मुद्दा उपस्थित करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी या प्रश्नांचा साधा उल्लेखही केला नाही.

मराठी आणि कन्नड या भगिनी भाषा आहेत, या विधानाला सीमाभागातील मराठी भाषिकांचा विरोध नाही. मात्र, भाषिक सलोख्याचा पुरस्कार करताना प्रत्यक्षात मराठी भाषिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडेही लक्ष देणे गरजेचे होते, अशी भावना व्यक्त होत आहे. एकीकडे मराठी-कन्नड ऐक्याचा संदेश द्यायचा आणि दुसरीकडे मराठी भाषिकांवर होत असल्याच्या तक्रारी असलेल्या अन्यायाबाबत मौन बाळगायचे, या भूमिकेवरून फडणवीस यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सीमाभागातील मराठी जनतेने महाराष्ट्राच्या नेत्यांकडून आपल्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, बेळगाव दौऱ्यात फडणवीस यांनी सीमाप्रश्नाचा उल्लेखही न केल्याने सीमावासीयांचा हिरमोड झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. त्यांच्या या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत काहींकडून निषेधही नोंदवला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.