belgaum

प्रकाश बेळगोजी यांची पत्रकार महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती

0
226
 belgaum

बेळगाव लाईव्ह : संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ, मुंबई या संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी बेळगावचे धडाडीचे पत्रकार तसेच बेळगाव Liveचे संपादक प्रकाश बेळगोजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगावात मराठी भाषेसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला आहे.

संस्थापक अध्यक्ष गोविंद घोळवे यांच्या सूचनेनुसार आणि प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या प्रादेशिक कार्यकारिणीत सीमा भागातील पत्रकाराची निवड झाल्याने सर्व स्तरांतून बेळगोजी यांचे अभिनंदन होत आहे.

दरम्यान, १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पुणे-पिंपरी येथे संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाची अधिकृत स्थापना करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात “महाराष्ट्र धर्म आणि पत्रकारिता” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

 belgaum

या परिसंवादात संपादक मंदार फणसे, संजय आवटे, तुळशीदास भोईटे आणि महेश म्हात्रे यांनी सहभाग घेत विचार मांडले. तसेच पद्मश्री प्रभुणे, विचारवंत संजय सोनवणे, खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांचीही उपस्थिती लाभली.

बेळगावातून लेखक व सीमालढ्याचे अभ्यासक गुणवंत पाटील यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणात बेळगाव प्रश्नावर महाराष्ट्र सरकारवर कडाडून टीका केली. “तज्ञ समिती अध्यक्ष म्हणून खासदार धैर्यशील माने यांनी केवळ एका बैठकीपुरतेच मर्यादित काम केले,” अशी टीका त्यांनी केली. तसेच समन्वयक मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी सीमा भागातील नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

या कार्यक्रमात बेळगाव Live चे संपादक प्रकाश बेळगोजी, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद प्रभू तसेच समितीचे युवा कार्यकर्ते सागर पाटील यांचाही सहभाग होता.

संयुक्त महाराष्ट्राच्या अपूर्ण लढ्याला पूर्णत्वास नेण्याचा निर्धार विचारवंतांनी व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रासमोरील विविध आव्हानांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.सीमा भागातील पत्रकारांना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळाल्याने या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.