रविवार दिनांक १७ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. नेहरू क्रीडांगणावर होणाऱ्या जनसेवक समावेश या कार्यक्रमासाठी येणाऱ्या अमित शहा यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु महाराष्ट्र एकीकरण समितीला केंद्रीय गृहमंत्री वेळ देतील का? याबाबत मात्र अद्याप स्पष्ट संकेत मिळाले नाहीत.
सीमाभागातील मराठी जनतेवर कर्नाटक सरकारची होत असलेली दडपशाही, कर्नाटक सरकारच्यावतीने करण्यात येत असलेले अन्याय, भाषिक अल्पसंख्यांकांचे हक्क अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ अमित शहा यांची भेट घेण्यासाठी इच्छुक आहेत. महानगर पालिकेवरील लाल – पिवळा झेंडा नुकताच फडकविण्यात आला असून यासंदर्भात सीमाभागात वादाची पार्श्वभूमी आहे.
कायद्याची पायमल्ली करण्यात येत असून कन्नड भाषिकांना एक न्याय आणि मराठी भाषिकांना एक न्याय अशी वागणूक देणाऱ्या कर्नाटक सरकारच्या या दुटप्पीपणाबद्दल अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीचा मानस आहे. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा वेळ समितीच्या शिष्टमंडळाला मिळेल का? किंवा अमित शहा समिती शिष्टमंडळाला वेळ देतील का? याबाबत अजूनही संभ्रम आहे.9
महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शहा यांच्या भेटीसाठी वेळ मागितला आहे. केवळ ५ ते १० मिनिटांचा तरी भेटीचा वेळ समिती शिष्टमंडळाने मागितला आहे. परंतु अद्यापही भाजप प्रदेशाध्यक्षांकडून यासंदर्भात कोणतेही संकेत मिळाले नाहीत. शेवटच्या क्षणापर्यंत अमित शहा यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रयत्नशील आहेत.