Saturday, April 20, 2024

/

न्यायालयाबाहेर वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील राहू – सदानंद सामंत

 belgaum

सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारिणी निवडीचा वाद निकालात काढण्यासाठी जुन्या कार्यकारिणीने न्यायालयात धाव घेतली असती तरी न्यायालयाबाहेर वाद मिटावा यासाठी आम्ही विद्यमान कार्यकारणीसमोर नव्याने विशेष सर्वसाधारण बैठक बोलावून तोडगा काढण्याचा प्रस्ताव ठेवणार आहोत, अशी माहिती सार्वजनिक वाचनालय हितरक्षण समितीचे अध्यक्ष सदानंद सामंत यांनी दिली.

शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी सदानंद सामंत यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की सार्वजनिक वाचनलय निवडणुकीसंदर्भात जो वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे ही मराठी संस्था अडचणीत आली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वाचनालयाच्या आजीव सभासद आणि मराठी भाषाप्रेमी मंडळींनी सार्वजनिक वाचनालय हितरक्षण समितीची स्थापना केली आहे. या समितीने गेल्या 15 दिवसात वाचनालयाचे जुने संचालक व पदाधिकाऱ्यांची त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची बाजू समजून घेतली. मात्र संचालक नेताजी जाधव, अनंत लाड, ॲड. ईश्वर मुचंडी, अनंत जांगळे आदी कोणाकडून देखील हितरक्षण समितीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. या सर्वांचे उत्तर पढवून दिल्याप्रमाणे एकच होते. आम्हाला कांही माहीत नाही आम्ही अध्यक्षांनाच सर्व अधिकार दिले आहेत, असे सांगून या सर्वांनी हात झटकले. कांही सभासदांनी तर निवडणूक झाली असे खोटेच सांगितले. या सर्वांमध्ये एकवाक्यता नव्हती, असे सामंत यांनी सांगितले.

जुनी कार्यकारणी न्यायालयात गेली असली तरी एकंदर सर्व परिस्थिती लक्षात घेऊन सार्वजनिक वाचनालय हितरक्षण समिती कार्यकारणी निवडीचा वाद न्यायालयात बाहेरच मिटावा यासाठी प्रयत्नशील असणार आहे. त्यासाठी आता आम्ही सर्व आजीव सभासद एकत्र येऊन विद्यमान अध्यक्षांकडे नव्याने विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी करणार आहोत. त्याचप्रमाणे या वादावर कोणता तोडगा काढणार? की पुन्हा प्रत्यक्ष निवडणूक घेणार? याचीही विचारणा करणार आहोत, असे सदानंद सामंत यांनी स्पष्ट केले.

तथाकथित विद्यमान कार्यकारिणीच्या सदस्यांकडून जी लपवाछपवी आणि उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. तसेच अध्यक्षांकडून हितरक्षण समितीसमोर येण्यास जी टाळाटाळ केली जात आहे ती पाहता न्यायालयात धाव घेणाऱ्या जुन्या कार्यकारिणीची बाजूच आम्हाला योग्य वाटते असे मत हितरक्षण समितीचे सदस्य प्रकाश मरगाळे यांनी यावेळी व्यक्त केले. पत्रकार परिषदेस गुणवंत पाटील, विकास कलघटगी, प्रा आनंद मेणसे, कृष्णा शहापूरकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.