बेळगाव लाईव्ह : “भात जास्त शिजलेला का दिला? चांगले जेवण द्यायला येत नाही का?” असा जाब विचारत धाब्यातील स्वयंपाकी आणि वेटरला काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणात दुसरे जेएमएफसी न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगतीमुळे न्यायालयाने हा निर्णय दिला.
या प्रकरणातील आरोपी सिद्धाप्पा चांगाप्पा तुडयेकर (वय ३५, व्यवसाय गवंडी, रा. महादेव गल्ली, राजहंसगड, ता. बेळगाव) याच्याविरोधात बेळगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी बाळासाहेब दिनकर देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आणि मारुती रामा पाटील हे देसूर-नंद्दीहळ्ळी रोडवरील राजहंसगडजवळील ‘राजहंस फोर्ड धाबा’ येथे स्वयंपाकी व वेटर म्हणून काम करत होते.
दि. ८ नोव्हेंबर २०१९ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आरोपी सिद्धाप्पा तुडयेकर हा जेवणासाठी धाब्यावर आला होता. जेवण करताना त्याला दिलेला भात जास्त शिजल्याचे सांगून त्याने फिर्यादी बाळासाहेब देसाई यांना शिवीगाळ केली. त्यानंतर “चांगले जेवण द्यायला येत नाही का?” असा जाब विचारत वाद घातला.
वाद वाढल्यानंतर आरोपीने धाब्यात पडलेली लाकडी काठी उचलून बाळासाहेब देसाई यांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या वेटर मारुती पाटील यांनाही आरोपीने डोक्यावर काठीने मारल्याचा आरोप होता. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले होते.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी भांडण सोडवून दोघांनाही उपचारासाठी वडगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल केले होते.
या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी भादंवि कलम ३२३, ३२४, ३४१, ३२६, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. त्यानंतर त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. पुढील तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
दरम्यान, खटल्याच्या सुनावणीदरम्यान साक्षीदारांच्या जबाबात विसंगती आढळून आल्याने न्यायालयाने आरोपी सिद्धाप्पा तुडयेकर याची निर्दोष मुक्तता केली.
आरोपीच्या वतीने अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.





