बेळगाव लाईव्ह : निवडणुकीत कोण मतदान करतो आणि कोण करत नाही, यापेक्षा राजकारणात सर्वांना सोबत घेऊन जाणे महत्त्वाचे आहे, असा संदेश गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी दिला आहे. जातीय समीकरणे आणि मतांची गणिते यापलीकडे जाऊन जनतेचा विश्वास संपादन करण्यावर भर देत त्यांनी राजकारणातील विरोधकांनाही अप्रत्यक्ष संदेश दिला. याचवेळी कत्ती कुटुंबावर टीका करत त्यांचा राजकीय संवाद पुन्हा चर्चेत आणला.
पंचायत भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात जारकीहोळी यांनी मतदान न करणाऱ्या नागरिकांनाही आपले मानून काम करण्याची भूमिका मांडली. मतदान केले नाही म्हणून एखाद्याशी वैर ठेवणे किंवा राजकीय आकस बाळगणे योग्य नसल्याचे सांगत, अशा मानसिकतेतून राजकारण करणाऱ्यांना फार काळ टिकता येणार नाही, असे त्यांनी सुनावले. निवडणुकीपुरते मतदारांशी संबंध ठेवण्याऐवजी निवडणुकीनंतरही सर्वांना समान वागणूक देणे, हाच आपल्या राजकीय वाटचालीचा आधार असल्याचे त्यांच्या विधानातून स्पष्ट झाले.
राजकारणात केवळ जातीच्या आधारावर यश मिळवता येणार नाही, असे सांगत त्यांनी मतदारांना प्रेम आणि विश्वासाने जिंकण्याची गरज अधोरेखित केली. दबाव, धमकी अथवा धाक दाखवून मत मिळवण्याच्या राजकारणाला त्यांनी नकार दिला.

आपणही राजकारणातून बाहेर पडण्याचा विचार केला होता; मात्र जनतेला दिलेली विकासकामांची आश्वासने पूर्ण करण्यासाठी राजकीय क्षेत्रात राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सध्या विरोधी पक्षात असलो तरी भविष्यात सत्ता मिळाल्यास ही कामे पूर्ण करू, असा विश्वासही व्यक्त केला.
दरम्यान, कत्ती कुटुंबावर टीका करताना रमेश जारकीहोळी यांनी त्यांच्याकडे केवळ बोलण्याची क्षमता असून प्रत्यक्ष कामाचा अभाव असल्याचा आरोप केला. पंचायत भवनासाठी ६० लाख रुपयांचा निधी आणि नंदगाव-मुत्नाळ येथील शाळांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या स्थानिक विकासाच्या पार्श्वभूमीवर त्यांची राजकीय विधानेही महत्त्वाची ठरली. मतदारांशी संबंध, जातीय राजकारण आणि स्थानिक नेतृत्वावरील टीका या तिन्ही मुद्द्यांतून जारकीहोळी यांनी आपली राजकीय भूमिका अधोरेखित केली.




