महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेला लाल – पिवळा ध्वज अनधिकृतरित्या उभारण्यात आला असून प्रशासनाने कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून त्वरित हा ध्व्ज हटविण्यात यावा अन्यथा मराठी भाषिक जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत देण्यात आला. सोमवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हुतात्मा दिन आणि महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेल्या लाल -पिवळ्या ध्वजसंदर्भात तसेच इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
आज झालेल्या बैठकीत प्रामुख्याने मनपासमोर उभारण्यात आलेल्या लाल पिवळ्या ध्वजाबाबत चर्चा झाली असून हा ध्वज त्वरित हटविण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. मनपासमोर फडकविण्यात आलेला लाल – पिवळा हा अनधिकृत असून बेकायदेशीर रित्या हा ध्वज उभारण्यात आला आहे. शिवाय हा ध्वज उभारणाऱ्या तथाकथीत कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांचे घर पेटवण्यात आल्याचा खोटा आरोपही मराठी भाषिकांवर करण्यात आला आहे. मराठी भाषिकांवर होत असलेले आरोप हे धादांत खोटे असून अशा तथाकथित कार्यकर्त्यांना मराठी माणूस भीकही घालत नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केली.
मनपा समोर उभारण्यात आलेल्या ध्वज लवकरात लवकर हटविण्यात यावा अन्यथा प्रत्येक घरासमोर, गल्लीसमोर भगवा झेंडा फडकविण्यात येईल, आणि मराठी भाषिकांविरोधात कट कारस्थान करणाऱ्यांना चोख प्रत्त्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. हा ध्वज लवकरात लवकर हटविण्यात यावा, आणि बेकायदेशीर रित्या कृत्य करणाऱ्या कन्नड कार्यकर्त्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी (दि. ६) निवेदन देण्यात येणार आहे. हा ध्वज हटविण्यात आला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी भाषिकांचा विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी बोलताना म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले कि, मराठी आणि कन्नड वाद चिघळण्यासाठी आणि तेढ निर्माण करण्यासाठी केलेलं हे कृत्य आहे. बेळगावमधील शांतता बिघडवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था पणाला लावण्यासाठी करण्यात आलेल्या या कृत्यावर प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा, यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने बुधवार दि. ६ रोजी निवेदन देण्यात येणार आहे. सरकारची मान्यता नसूनही आणि हायकोर्टाने या ध्वजाला बंदी घातली असूनही अनधिकृतरित्या फडकविण्यात आलेला हा ध्वज द्वेष पसरविण्यासाठी करण्यात आलेले कृत्य असल्याचे त्यांनी म्हटले. मराठी भाषिक नेहमीच शांततेच्या आणि कायद्याच्या बाजूने सीमाप्रश्नी लढा देत आहेत. हा ध्वज हटविण्यात आला नाही तर संपूर्ण सीमाभागात भगवे ध्वज फडकविण्यात येतील, याला प्रशासनाने विरोध करता काम नये, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. येत्या १७ जानेवारी रोजी होणार हुतात्मा दिन गांभीर्याने पाळून यशस्वीरीत्या पार पाडावा, असेही आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला दीपक दळवी, मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर आदींसह इतर समिती नेते, मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.