बेळगाव तालुक्यात बकरी मृत्यूच्या घटना वाढल्या असून यामध्ये मेंढपाळांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनांचे गांभीर्य प्रशासनाने ओळखावे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राज्य शेळी मेंढी पालन विकास महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे करण्यात आली आहे.
राज्य शेळी मेंढी पालन विकास महामंडळाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी तसेच गांधी नगर याठिकाणी अनेक बकऱ्यांचा हकनाक बळी गेला आहे.
या घटनेमागील कारणांचा शोध घेऊन नुकसानग्रस्तांना पाच हजार रुपयांची भरपाई देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शेकडो मेंढपाळांनी आज आंदोलन करत सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात महामंडळाचे अध्यक्ष पंडितराव चिद्री यांच्यासह अनेक मेंढपाळांनी सहभाग घेतला होता.