Sunday, March 9, 2025

/

…अन् चक्क रहदारी पोलिसांनी हटविला रस्त्यावरील मातीचा ढिगारा

 belgaum

बेेेळगाव स्मार्ट सिटी लि. च्या अनागोंदी कारभारामुळे आता चक्क रहदारी पोलिसांना रस्ता दुरुस्तीची कामे करावी लागणार की काय? असे आरपीडी रोड येथे आज घडलेल्या घटनेवरून म्हणावे लागेल. कारण रहदारी नियंत्रण सोडून एका पोलिसाने चक्क हातात फावडे घेतल्याचे चित्र आज सकाळी याठिकाणी पहावयास मिळाले.

याबाबतची माहिती अशी की, आरपीडी रोडवरील मातीचे ढिगारे हटविण्यात आले नसल्याने शुक्रवारी सकाळी एका दुचाकीवाहन चालकाला अपघाताला सामोरे जावे लागले. सदर रस्त्याचे विकास काम केल्यानंतर त्या ठिकाणचे अडथळे हटविण्याकडे दुर्लक्ष केल्याने याचा फटका त्या दुर्दैवी दुचाकी वाहनचालकाला बसला.

या पद्धतीने पादचारी आणि वाहनचालकांना आरपीडी रोडवरील मातीच्या ढिगार्‍यामुळे होणारा त्रास पाहून आज सकाळी आरपीडी क्रॉस येथे नियुक्त रहदारी पोलिसानेच हातात फावडे घेऊन रस्त्यावरील मातीचा ढिगारा हटविला. रहदारी नियंत्रणाचे आपले काम सोडून पोलीस एखाद्या कामगाराप्रमाणे रस्त्यावरील माती हटवून सपाटीकरण करताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच संबंधित पोलिसाबद्दल कौतुकोद्गार काढले जात होते.Traffic police

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आरपीडी कॉर्नर ते रोड कॉर्नर पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. काँक्रिटीकरण करून तीन महिने उलटले तरी येथील रस्त्याशेजारी साईड पट्ट्या घालण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मातीचे ढिगारे, पिव्हर्स तसेच वाळू पडून आहे. त्यामुळे वाहनचालकांना विशेष करून दुचाकी वाहनचालकांसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेली अनेक विकास कामे रखडली आहेत. कांही ठिकाणी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होऊन देखील मातीचे ढिगारे हटविण्यात आलेले नाहीत.

अर्धवट अवस्थेतील विकासकामांमुळे नागरिकांना ये-जा करताना अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. अपघाताच्या घटना घडून देखील स्मार्ट सिटीचे अधिकारी सुस्त असल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आता चक्क पोलिसांना रस्त्याची कामे करावी लागत आहेत हे पाहून तरी किमान स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार का? असा सवाल केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.