बेळगाव शहर आणि उपनगरांसह ग्रामीण भागात अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. चोऱ्या व घरफोड्या करणाऱ्या सशस्त्र चोरट्यांचा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून त्या चोरट्यांना तात्काळ गजाआड केले जावे, अशी मागणी होत आहे.
गेल्या कांही महिन्यांपासून शहर, उपनगरं आणि ग्रामीण भागात सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. शिवाजी कॉलनी, शांतीनगर, गजानन महाराजनगर परिसरात चोरट्यांनी हैदोस घातला आहे. या ठिकाणच्या चोरीच्या घटनांत सहभागी असलेल्या चौघा चोरट्यांची छबी आणि व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
तोंडावर मास्क आणि हातात शस्त्रे घेऊन आलेले हे चोरटे एका बंगल्याच्या गेट वरून उडी घेऊन आत प्रवेश करत आहेत. त्यानंतर दरवाजाचा कडीकोयंडा तोडत घरातील किमती ऐवजावर डल्ला मारत आहेत. चोरट्यांच्या या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. त्यामुळे तातडीने चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी होत आहे.
दरम्यान, चोऱ्या व घरफोड्या करणाऱ्या हातात शस्त्रं असलेल्या चोरट्यांचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर नुकतीच व्हायरल झाली आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे दहशतपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
चोरीच्या घटनांमध्ये स्थानिक गुन्हेगारांसह परप्रांतीय गुन्हेगार सक्रिय झाले असल्याने पोलिसांची देखील डोकेदुखी वाढली आहे. विविध ठिकाणच्या चोरीच्या ठिकाणी घटनास्थळी मिळालेल्या ठशांच्या नमुन्यांवरून पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे येत्या कांही दिवसात चोरट्यांना गजाआड केली जाईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.