बेळगाव शहर परिसरात काल दुपारनंतर निर्माण झालेले ढगाळ पावसाळी वातावरण आज बुधवारी दिवसभर कायम होते. आज पाऊस पडला नसला तरी कुंद वातावरणासह हवेत गारवा होता.
बेळगाव शहर परिसरात काल मंगळवारी दुपारी सव्वा चार साडेचारच्या सुमारास ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी निर्माण झालेले ढगाळ वातावरण इतके गडद होते की ऐनदुपारी तिन्हीसांजचे वातावरण निर्माण झाले होते. पाऊस आणि त्यात अंधाराचे वातावरण यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना आपले दिवे पेटवावे लागले होते. बाजारपेठेतील दुकानांची देखील हीच अवस्था होती. बहुतांश दुकानदारांनी दुकानातील दिवे लावून आपले व्यवहार सुरु ठेवले होते.
काल मंगळवारी दुपारनंतर निर्माण झालेले हे ढगाळ वातावरण आज बुधवारी दिवसभर कायम होते. परिणामी आजही बराच दुकानांमधील दिवे दिवसाढवळ्या जळताना दिसत होते. आज पावसाने जरी हजेरी लावली नसली तरी कुंद वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. हवेतील गारव्यामुळे गेले कांही दिवस उष्म्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना काल सायंकाळपासून दिलासा मिळाला. तथापि आजारी आणि वयोवृद्ध लोकांना मात्र या वातावरणाचा त्रास झाल्याच्या तक्रारी होत्या.
मान्सून केरळ च्या उंबरठ्यावर आला आहे तर लवकरच बेळगाव मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर वळीव आणि मान्सून यांची सरमिसळ होऊन लवकरच पावसाळा चालू होईल असे जाणकारांचे मत आहे हे वातावरण आता निवडला असे वाटत नाही आता लोकांना छत्र्या रेनकोट आणि टोप्या त्याच्या सहज बाहेर पडावे लागेल कारण पावसाळा सुरू झाला.
ढगाळ वातावरण आगामी रविवार 22 मेपर्यंत असण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.