पदवीपूर्व प्रथम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बोलाविण्यात आलेली सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक आज शुक्रवारी सकाळी शहरातील आर.एल.एस. कॉलेजमध्ये पार पडली.
राज्यातील पदवीपूर्व प्रथम (पीयुसी) वर्षाच्या वार्षिक परीक्षेला येत्या सोमवार दि. 28 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. या परीक्षेसंदर्भात सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी बेळगाव जिल्हा पदवीपूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक नागराज व्ही. यांनी आज शुक्रवारी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक बोलावली होती. शहरातील आर.एल.एस. कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वतः उपसंचालक नागराज व्ही. हे होते. त्याप्रमाणे व्यासपीठावर चिंतामणराव कॉलेज शहापूरचे प्राचार्य बी. वाय. हन्नूर, आरएलएस कॉलेजचे प्राचार्य व्ही. सी. कामगोळ आणि उपप्राचार्य डॉ. एस. ए. जवळी उपस्थित होते.
बैठकीमध्ये उपसंचालक नागराज यांनी पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या पदवीपूर्व प्रथम वर्षाच्या परीक्षेच्या कायदे -नियमांसंदर्भात उपस्थित प्राचार्यांना मार्गदर्शन करून आवश्यक सूचना केल्या.
प्रामुख्याने परीक्षेसंदर्भातील माहिती देणे, पेपर फोटो पाठवणे आदी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणासाठी व्हाट्सअपचा वापर केला जाऊ नये, अशी सक्त सूचना यावेळी देण्यात आली. त्याचप्रमाणे परीक्षसंदर्भात अत्यंत जरूरीचे काम असल्यास किंवा कांही तांत्रिक अडचणी आल्या तर कोणत्या वेळी कोणाशी संपर्क साधावा याबाबतही बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.
पदवीपूर्व प्रथम वर्षाच्या परीक्षेची जबाबदारी हाताखालील लोकांवर न संपवता संपूर्ण जबाबदारी व्यक्तिशः प्रत्येक प्राचार्यांनी घ्यावी अशी विनंती प्राचार्य बी. वाय. होन्नूर यांनी केली. बैठकीत उपस्थित प्राचार्यांच्या सल्ला -सूचना जाणून घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. बैठकीस सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आवर्जून उपस्थित होते. शेवटी प्राचार्य व्ही. सी. कामगोळ यांनी सर्वांचे आभार मानले.