बेळगाव शहर कर्नाटक सरकारच्या येत्या 13 ते 23 डिसेंबर 2021 या कालावधीत होणाऱ्या 10 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनासाठी सज्ज होत आहे. अधिवेशन काळात नेतेमंडळी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, सर्वकांही सुरळीत पार पडावे यासाठी जिल्ह्यातील अधिकारीवर्ग ‘ओव्हर टाईम’ काम करत आहेत.
अधिवेशनादरम्यान जेवणखाण, निवास आणि वाहतुकीची सोय पाहण्यासाठी खास समित्या स्थापण्यात आल्या आहेत. शहरातील 65 हॉटेलच्या 1,780 खोल्या 12 ते 24 डिसेंबर या कालावधीत नेतेमंडळी आणि सरकारी बाबुंसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. निवास व्यवस्था समितीचे प्रमुख डॉ. सुरेश इटनाळ यांनी सर्व हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेऊन 2018 च्या अधिवेशन काळातील भाड्याप्रमाणे यावेळी भाडे दिले जाईल, असे स्पष्ट केले आहे. हॉटेल व्यावसायिकांनी कोरोना काळातील नुकसान लक्षात घेऊन भाडे वाढवावे, अशी मागणी केली. मात्र ती मान्य झाली नाही, त्याऐवजी भाडे रक्कम शक्य तितक्या लवकर देण्याची मागणी मान्य झाली. अधिवेशन काळात 1,780 हाॅटेल खोल्या अन्य कुणालाही उपलब्ध करून देण्याचे आदेश बजावण्यात आल्याने या काळात बेळगावला येणार यांची गोची होणार आहे. तथापि प्रशासनाचा आदेश असल्यामुळे हॉटेल मालकांना त्याचे पालन करावेच लागणार आहे.
येत्या आठवड्याभरात सर्व हॉटेल्सचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. जलकुंभांची स्वच्छता करावी. आठवड्यानंतर समितीकडून सर्व हॉटेल अशी पाहणी केली जाणार आहे. त्यावेळी कोणत्याही त्रुटी आढळतात कामा नयेत असेही बजावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोरोना मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करण्याबरोबरच नियमित स्वच्छता थर्मल स्क्रीनिंग आदी गोष्टी पाळाव्यात अशी सूचना हॉटेल मालकांना देण्यात आली आहे. दरम्यान अधिवेशनाचे स्थळ असलेल्या सुवर्ण विधानसौध इमारतीची देखील झाडलोट -साफसफाई केली जात आहे. आवश्यक गोष्टींची दुरुस्त करण्याबरोबरच इमारतीच्या पायऱ्या, चौथरा, फरश्या स्वच्छ धुऊन साफसूफ केल्या जात आहेत.