सीमाभागातील मराठी संस्कृती जपण्यात साहित्य संमेलनांचा मोठा वाटा आहे. तालुक्यातील उचगाव भागात आज विसाव्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्याचा जागर आज उचगावमध्ये करण्यात आला.
चार सत्रात झालेल्या या संमेलनात अनेक मान्यवर साहित्यिकांसह रसिकांनाही साहित्याची मेजवानी मिळाली. या संमेलनाच्या अध्यक्षपदी निपाणी येथील पंचम खेमराज कॉलेजचे प्राचार्य आणि देवचंद कॉलेजचे माजी उपप्राचार्य प्रा. डॉ. अच्युतराव माने हेउपस्थित होते.
गावातील प्रमुख मार्गावरून संमेलन स्थळापर्यंत भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत भजनी मंडळाने भक्तिमय वातावरणात भजनी ठेका धरला. अडत व्यापारी टी. एस. पाटील यांच्याहस्ते संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. संमेलनाची सुरुवात श्री गणेश मूर्ती पूजनाने झाली, त्यानंतर श्री विठ्ठल रखुमाई पूजन, पालखी पूजन, ग्रंथ दिंडीचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तिचे पूजन, श्री मळेकरणी देवीचे पूजन, सभा मंडपाचे उदघाटन, व्यासपीठाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी लक्ष्मण होनगेकर हे होते. संमेलनाच्या सुरुवातीला प्रास्ताविक आणि स्वागत लक्ष्मण होनगेकर यांनी केले. यावेळी संमेलनाचा मागील वर्षांचा आढावा त्यांनी आपल्या प्रास्ताविकात घेतला.
या संमेलनाच्या पहिल्या सत्रात अच्युतराव माने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर दुसर्या सत्रात सांगली पलूस येथील हिम्मत पाटील यांचे कथाकथन आणि तिसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या रसिकांच्या उपस्थितीत हा संमेलनाचा सोहळा पार पडला. या संमेलनात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सेक्रेटरी एन. ओ. चौगुले यांनी आभार मानले.