भारतीय हवाई दलाच्या 3,624 प्रशिक्षणार्थी एअरमन्सचा दीक्षान्त समारंभ आज शनिवारी सकाळी सांबरा हवाई दल केंद्राच्या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडला.
भारतीय हवाई दलाच्या सांबरा हवाईदल केंद्राच्या मैदानावर आज सकाळी आयोजित या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बेंगलोर येथील हेडकॉटर ट्रेनिंग कमांडचे टेक्निकल ट्रेनिंग ऑफिसर एअर व्हाईस मार्शल विवेक पिल्लाई उपस्थित होते.
प्रारंभी वाद्यवृंदाच्या तालावर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एअरमन्सनी शानदार पथसंचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर एअर व्हा. मार्शल पिल्लाई यांनी खुल्या जीपमधून परेडची पाहणी केली. दीक्षांत समारंभ झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
![](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2021/01/USER_SCOPED_TEMP_DATA_orca-image-1610789955791_6756142754736779042.jpeg)
यावेळी बेस्ट इन सर्व्हिस ट्रेनिंगमधील सर्वोत्तम एअरमन हा पुरस्कार गगन शिसोदिया याला तर बेस्ट इन अकॅडमी पुरस्कार अमितसिंग भदोरिया, बेस्ट मार्क्समन पुरस्कार वीरेंद्र चौधरी आणि ओव्हर ऑल फर्स्ट इन ऑर्डर ऑफ मेरीट हा पुरस्कार विनीत कुमार याला प्रदान करण्यात आला.
आपल्या समयोचित भाषणात एअर व्हा. मार्शल विवेक पिल्लाई यांनी देश संरक्षणासह त्याग आणि बलिदानाचे महत्व विशद करून कोरोनासंदर्भात मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. सदर समारंभास निमंत्रित पाहुण्यांसह हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एअरमन्सचे नातलग बहुसंख्येने उपस्थित होते.