Friday, September 13, 2024

/

आदर्श गावासाठी प्रथम स्वच्छतेला द्या महत्व : भास्कर पेरे -पाटील

 belgaum

आपले गांव “आदर्श गांव” बनवायचे असेल तर प्रथम स्वतः स्वच्छता पाळण्याबरोबरच गावात स्वच्छता ठेवा. गावात 100 टक्के शौचालये झाली पाहिजेत. पाणी शुद्ध ठेवून त्याचा जमिनीत निचरा करा, फळझाडे लावा, असे मार्गदर्शनपर विचार महाराष्ट्रातील आदर्श सरपंच भास्कर पेरे -पाटील यांनी व्यक्त केले.

निलजी ग्रामस्थ आणि निलजी ग्राम विकास समितीतर्फे गावातील हनुमान मंदिरासमोर आयोजित आपल्या व्याख्यानाप्रसंगी भास्कर पेरे -पाटील यांनी उपरोक्त विचार व्यक्त केले. स्वच्छता पाळा. साफसफाई आपल्या आईवडिलांनी सांगितली आहे. “हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे” म्हणजेच लक्ष्मी कुठे नांदते तर ती स्वच्छतेच्या ठिकाणी नांदते, हे लक्षात घेतले पाहिजे. यासाठी गावात साफसफाई बरोबरच 100 टक्के शौचालये झाली पाहिजेत. 400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या शौचालयाचे मी रायगडावर जाऊन दर्शन घेतले आहे.

याचा अर्थ त्या काळात देखील शौचालयाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जात होते. आदर्श गांव बनवण्यासाठी पहिले काम पिण्याचे पाणी शुद्ध करणे, दुसरे काम वापरलेले पाणी जमिनीत गेले पाहिजे, तिसरे काम फळांची झाडे लावणे आणि चौथे काम गावात स्वच्छता राखणे हे आहे असे सांगून पेरे -पाटील यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.Pere patil nilji

निलजी ग्राम विकास समितीचे छत्रू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सुदर्शन प्रभू, एलआयसी व्यवस्थापक गोपीप्रसाद बिरा आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर हे उपस्थित होते. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर प्रमुख व्याख्याते भास्कर पेरे -पाटील यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन आणि रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ग्राम विकास समिती निलजी या फलकाचे अनावरण झाल्यानंतर आयोजकांतर्फे वारकरी बंधू चंद्रकांत पाटील आणि भरमा पाडसकर यांच्या हस्ते आदर्श सरपंच भास्कर पेरे -पाटील यांचा शाल, मानपत्र, भेटवस्तू व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

त्याचप्रमाणे रमेश मोदगेकर, मधु मोदगेकर, गजानन सुतार, रेखा मोदगेकर यल्लाप्पा शहापूरकर, पिराजी अनगोळकर, रेखा शहापूरकर आदी 22 नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य तसेच चित्रकला शिक्षक गजानन लोहार, कार्व्हिंग आर्टिस्ट भरमा सुतार, वारकरी चंद्रकांत पाटील व लक्ष्मण पाडसकर यांचा देखील सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून एलआयसी व्यवस्थापक गोपीप्रसाद बिरा यांच्या हस्ते बिमा ग्राम धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी सुदर्शन प्रभू व गोपीप्रसाद बिरा यांची समयोचित भाषणे झाली.

अध्यक्षीय भाषणात छत्रु पाटील यांनी भास्कर पेरे -पाटील यांचे व्याख्यान आयोजनाचा मूळ उद्देश स्पष्ट करून आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. व्याख्यानाच्या कार्यक्रमास नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांसह निलजी तसेच पंचक्रोशीतील गावांमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे कार्यक्रमासाठी घालण्यात आलेला शामियाना तुडुंब भरला होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.