कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीररीत्या महापालिकेसमोर लावण्यात आलेला लाल-पिवळा ध्वज हटविण्यात यावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.
आज यासंदर्भात जिल्हा शिवसेना कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिवसेना बेळगावचे संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महापालिकेसमोर फडकविण्यात आलेला लाल – पिवळा ध्वज हा अनधिकृत असून हा ध्वज त्वरित हटविण्यात यावा, अन्यथा शिवसेनेतर्फे घरोघरी भगवा ध्वज लावण्यात येईल असा इशारा या बैठकीत देण्यात आला.
तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जो निर्णय घेतला आहे, त्याला शिवसेनेचा पाठिंबा देण्यात आला असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले.
या बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी सचिन गोरले, दिलीप बैलूरकर, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, प्रकाश राऊत, बसवानी कुरंगी ,रवींद्र जाधव, दत्ता जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.