मुस्लिम कार्यक्रमात जाऊन टोपी घालतो, आणि हिंदूंच्या कार्यक्रमात फेटा बांधतो. या गोष्टीचे राजकारण करण्यात येत आहे. आज पर्यंत मी हिंदू – मुस्लिम या दोन्ही समाजासाठी कार्यकेले आहे. परंतु मी देशद्रोही नाही, असा टोला पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सतीश जारकीहोळी यांना लगावला आहे. केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत रमेश जारकीहोळी यांचा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमातील टोपी घातलेला फोटो प्रसारमाध्यमांसमोर दाखविला होता. आणि रमेश जारकीहोळी ३० वर्षात टोपी घातलेले निदर्शनास आले परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात ते कधीही दिसले नाहीत, असा टोला सतीश जारकीहोळींनी लगावला होता. याला प्रत्त्युत्तरादाखल आज रमेश जारकीहोळी यांनी प्रसारमाध्यमांसमोर पुन्हा प्रतिटोला लगावला आहे.
शुक्रवारी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना रमेश जारकीहोळी म्हणाले कि, पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देण्याविरोधात मी आहे. भाजप मुस्लिम विरोधी नाही. तसेच मी अन्यायग्रस्त, वंचित, अल्पसंख्यांक, हिंदूंच्या समर्थनार्थ कार्य करत आहे. परंतु सतीश जारकीहोळी माझ्याबाबतीत जे वक्तव्य केले आहे, ते अत्यंत विचित्र असल्याचे मत रमेश जारकीहोळींनी व्यक्त केले. जबाबदार पदावर असूनही अशापद्धतीने वक्तव्य करणे हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. माझे वडील जनसंघाच्या असताना कोणते कार्य केले आहे, हे जाणून घेणे आवश्यक असून गोकाकमध्ये जाऊन याची शहानिशा करून घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
जगन्नाथ जोशी यांच्या नेतृत्वाखाली जनसंघाच्या आंदोलनात सहभाग घेतला आहे. जगन्नाथ जोशी यांचा मी समर्थक आहे. मी जनसंघात आलो हे खरे आहे. तसेच काँग्रेसमध्ये जातीयवाद केला जातो हेही खरे आहे. तसेच अजमेर येथे मुस्लिम कार्यक्रमात जाऊन टोपी घातली हेही खरे आहे. सतीश जारकीहोळी यांचे मानसिक संतुलन बिघडले असून आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या सतीश जारकीहोळींनी सध्याची जबाबदारी नीट सांभाळावी, आगामी निवडणुकीत यमकनमर्डी मतदार संघातून सतीश जारकीहोळी कसे निवडून येतात, हे पाहुयात. गेल्या ७ वर्षांपासून आराम करत असलेले सतीश जारकीहोळी नेतृत्वासाठी योग्य नाहीत, नेतृत्वगुण नसलेले सतीश हे माणुसकीला अशोभनीय वक्तव्य करत असून केवळ राजकारणासाठी अर्थहीन वक्तव्य करत असल्याचा आरोप रमेश जारकीहोळींनी केला.