बेळगाव शहर परिसरात धोकादायक खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये विकास कामामुळे निर्माण झालेल्या एका नव्या पद्धतीच्या जीवघेण्या खड्ड्याची भर पडली आहे. मात्र रहदारी पोलिसांनी लागलीच दखल घेऊन या खड्ड्याच्या ठिकाणी बॅरिकेड घालून धोक्याचा फलक लावला आहे.
क्लब रोडवरील ज्योती कॉलेज समोरील रस्त्याच्या दुभाजकाला लागून गटारीसाठी करण्यात आलेले खोदकाम उघड्यावर सोडण्यात आले आहे.
दुभाजकाला लागूनच उघडे ठेवलेले हे भलेमोठे भगदाड जणू मृत्यूचा सापळा बनले होते. भगदाडाच्या चारी बाजूचे लोखंडी गज देखील तसेच उघडे ठेवण्यात आले होते. या खड्ड्याचा फोटो खुद्द मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचल्याची बातमी आहे.
दरम्यान, या खड्ड्याबाबतची माहिती मिळताच रहदारी पोलिसांनी तात्काळ बॅरिकेड्स टाकून धोक्याच्या सूचना फलक खड्ड्याच्या ठिकाणी उभा केला आहे.
तेंव्हा आता रस्त्याचे विकास काम करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विकास काम लवकरात लवकर पूर्ण करून हा धोकादायक खड्डा बुजवावा अशी जोरदार मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
क्लबरोड्वर भले मोठे भगदाड!