बेळगाव महापालिकेने नव्या पुनर्रचनेनुसार संपूर्ण 58 प्रभागाचा एकच नकाशा तयार केला आहे. या नकाशामुळे प्रत्येक प्रभागाची हद्द समजते, परंतु प्रभागातील गल्ल्या व उपनगरांची सविस्तर माहिती मिळत नसल्याने तो नकाशा उपयुक्त ठरत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा तयार करून द्यावा अशी, जोरदार मागणी होत आहे.
बेळगावची प्रभाग पुनर्रचना 2018 मध्ये झाली. त्याचवेळी महापालिकेने 58 प्रभागांचा मिळून एकच नकाशा तयार केला आहे. त्यात प्रभाग क्रमांक व त्या प्रभागाची हद्द निश्चित करण्यात आली आहे.
सध्या महापालिकेकडून तोच नकाशा इच्छुकांना दिला जात आहे. परंतु हा नकाशा कांही कामाचा नसल्याचे इच्छुकांचे म्हणणे आहे. शिवाय महापालिकेकडून नकाशासाठी 400 रु. शुल्क आकारले जात असल्याने नापसंती व्यक्त होत आहे.
आता अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रभाग निहाय नकाशे तयार केले जाण्याची शक्यता आहे. नगर विकास खात्याने जाहीर केलेल्या प्रभाग आरक्षणात बदल होण्याची शक्यता देखील आहे. तरी ही तात्कालिक आरक्षणाच्या आधारे काहींनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नवे प्रभाग असल्याने त्यात नेमका कोणता भाग येतो? हेच लोकांना माहित नाही.
त्यामुळे त्यांना प्रभागाचा स्वतंत्र नकाशा हवा आहे. दरम्यान, महापालिकेचे कौन्सिल सेक्रेटरी पिरजादे यांनी प्रत्येक प्रभागाच्या स्वातंत्र्य नकाशाच्या मागणीसंदर्भात आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे.