सीमाभाग विकास प्राधिकरण बैठक नुकतीच पार पडली. कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सी. सोमशेखर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सीमाभागातील पायाभूत सुविधांच्या पुर्ततेविषयी चर्चा करण्यात आली.
सीमाभागातील गावांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे भेट देऊन तेथील जनतेच्या समस्या जाणून घ्याव्यात. तसेच तेथील पायाभूत सुविधांविषयी वेळोवेळी पाठपुरावा करावा, अशी सूचना सोमशेखर यांनी केली.
सिमाप्रदेशातील पायाभूत सुविधांसाठी अतिरिक्त अनुदान मिळवण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अथणी येथील कन्नड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अथणी विभागात असलेल्या समस्या सोडविण्यासाठी तसेच अथणी येथे सरकारी कन्नड हायस्कुलची स्थापना करण्यासाठी डॉ. सोमशेखर यांना निवेदन दिले. यावेळी या कार्यकर्त्यांना त्यांची मागणी सरकार दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले.
यावेळी प्रभु चन्नबसव स्वामी, मुदगल महंतस्वामी, सीमा सचिव प्रकाश मत्तीहळळी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या बैठकीनंतर महाराष्ट्र सीमेवरील खळेगाव येथील बसवेश्वर देवस्थान सांस्कृतिक भवनच्या कामकाजाचे, पंचायत राज इंजिनियरिंग विभागाच्या वतीने सुरू असलेल्या शाळा वर्गखोल्यांच्या कामकाजाची पाहणी सोमशेखर यांनी केली.