बेळगावमध्ये शनिवारी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली-केंद्र सरकारने जारी केलेल्या कृषी कायद्याविरोधात अनेक शेतकरी एकवटले असून दिल्ली येथे या विरोधात आंदोलनदेखील छेडण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध शेतकऱ्यांच्यावतीने नवी दिल्ली येथे पुकारण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या समर्थनार्थ शनिवार दिनांक २३ जानेवारी रोजी बेळगावमध्ये ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय कृषी समाजाच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संघटनेचे राज्याध्यक्ष सिदगौड मोदगी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले कि, शनिवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या ट्रॅक्टर रॅलीत मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असून चन्नम्मा सर्कल पासून या रॅलीला सुरुवात होणार आहे. चन्नम्मा सर्कल पासून सुरु झालेली रॅली संगोळी रायन्ना सर्कल, कोटे केरे, गांधी नगर मार्गावरून राष्ट्रीय महामार्गाद्वारे दुपारी हिरेबागेवाडी आणि त्यानंतर कित्तूर येथे थांबणार आहे.
त्याठिकाणी संत बसवेश्वर आणि राणी चन्नम्मांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर या विभागातील प्रमुख मार्गांवरून हि रॅली पुन्हा मार्गक्रमण करणार आहे.
दुपारी ३.३० नंतर हुबळी- धारवाड अवळी नगरमधील तळुली येथे हि रॅली पोहोचणार आहे. या आंदोलनाला रयत, दलित, कर्मचारी, विद्यार्थी, तरुण आणि महिला संघटनांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.