कर्नाटकात मराठा प्राधिकरणाची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे, अशी टीका काँग्रेसचे राज्यध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली आहे.
सीमाभागात सर्व काही व्यवस्थित आणि सुरळीत होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी अनावश्यक असे विधान केले. कदाचित उद्धव ठाकरेंकडून प्रेरणा घेऊनच मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यासाठी सरकार सरसावले असल्याची टीका, डी. के. शिवकुमार यांनी केली आहे.
सदाशिवनगर येथील आपल्या निवासस्थानी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्य विभाजनावेळी घेतलेला निर्णयाचा अध्याय आता संपला आहे. कर्नाटकाचा नकाशा स्पष्ट असून कर्नाटकात जिल्हा आणि गावपातळीवरील विभागणीही झाली आहे. येथील प्रत्येक भागाच्या विकासासाठी आम्ही कष्ट घेतले आहेत. कर्नाटकात कोणताही भाग येणार नाही आणि कर्नाटकाचा कोणताही भाग देणार नाही. सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम आहे. उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. विनाकारण गोंधळ माजवून उद्धव ठाकरेंनी राजकारण करू नये, अशी प्रतिक्रियाही डीकेशींनी व्यक्त केली.
कर्नाटकात स्थापन करण्यात आलेल्या मराठा प्राधिकरणाविषयी बोलताना ते म्हणाले कि, राज्यात मराठा प्राधिकरण स्थापनेसाठी उद्धव ठाकरेंकडून भाजप सरकारला प्रेरणा मिळाली असून राज्यातील मराठा समाजाच्या विकासासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून याची काहीही आवश्यकता नव्हती. कर्नाटकात शांतता आणि सुव्यवस्था उत्तम होती. विनाकारण मराठा प्राधिकरणाची घोषणा करून राज्यात गोंधळ माजला. कर्नाटकात मराठा प्राधिकरणाच्या मुद्द्यावरून विनाकारण गोंधळ होत असून याला अनेकांचा विरोध देखील आहे. हे सरकार धर्म, जातींच्या मध्ये विष पेरत असल्याचा आरोप डीकेशींनी केला.